शहादा व परिसरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST2021-07-26T04:28:10+5:302021-07-26T04:28:10+5:30
पावसामुळे नगरपालिकेच्या महात्मा गांधी पार्क, म्युनसिपल न्यू इंग्लिश स्कूलशेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर व विविध वसाहतींमध्ये पाण्याची डबकी साचली आहेत. ...

शहादा व परिसरात पाऊस
पावसामुळे नगरपालिकेच्या महात्मा गांधी पार्क, म्युनसिपल न्यू इंग्लिश स्कूलशेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर व विविध वसाहतींमध्ये पाण्याची डबकी साचली आहेत. या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.
गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे व्यापार, व्यवसाय ठप्प झाले होते. शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरीही हतबल झाले होते. यंदा पाऊस वेळेवर होऊन खरीप हंगाम चांगला येईल, या आशेवर शेतकरी होते. सुरुवातीला झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी कापूस लागवड, सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. त्यानंतर मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी खालावल्याने बागायती पिकांवरही संकट आले होते. शनिवारी सायंकाळी व रविवारी पहाटे पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी व नागरिक सुखावले आहेत. रविवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शहरातील अनेक मोकळ्या जागांमध्ये पाण्याची डबकी साचली आहेत. नदी-नाल्यांनाही पूर आला असून काही शेतांमध्ये पाणी साचले आहे. यंदाच्या पावसाळ्यात गोमाई नदीला पहिलाच पूर आल्यामुळे नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.