शहादा व नवापुरला होणार नवीन पोलीस ठाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:29 IST2020-09-19T12:29:35+5:302020-09-19T12:29:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि दोन राज्याच्या सिमेवरील वाढती दारू, गुटखा, वाळू तस्करी ...

शहादा व नवापुरला होणार नवीन पोलीस ठाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी आणि दोन राज्याच्या सिमेवरील वाढती दारू, गुटखा, वाळू तस्करी पहाता जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्यासाठी पोलीस दलाकडून चाचपणी केली जात होती. अखेर दोन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात शहादा शहर आणि नवापूर शहरासाठी ही नवीन पोलीस ठाणी राहणार आहेत. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात उपनगर पोलीस ठाण्याची भर पडली होती.
जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. नंदुरबार, शहादा, नवापूर या भागात एमआयडीसी विकसीत होत असल्याने नवीन उद्योग येण्यासाठी उत्सूक आहेत. रेल्वेमार्ग, चार राष्टÑीय आणि चार राज्य मार्ग, दोन राज्यांच्या सिमा यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांवर मोठा ताण पडत असतो. सण, उत्सव, सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात तर पोलिसांची परिक्षाच राहते. बाहेरून अतिरिक्त बंदोबस्त मागवावा लागतो. ही बाब लक्षात घेता पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी अशी मागणी गेल्य अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्याची आता दखल घेण्यात आली असून प्रस्ताव रवाना झाले आहेत.
शहादा पोलीस ठाणे
शहादा पोलीस ठाण्यावर मोठा भार आहे. ७० हजार लोकसंख्येचे शहादा शहर आणि तालुक्यातील दहा मोठी गावे आणि ५० पेक्षा अधीक गावे या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतात. शहादा शहरात गेल्या काही वर्षात वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती.
संवेदनेशील शहर म्हणून देखील ओळख निर्माण होऊ पहात आहे. त्यामुळे पोलीस दलाचा जास्त वेळ आणि शक्ती ही शहराच्या कायदा व सुव्यवस्थेतच जास्त जात जाते. त्यामुळे ग्रामिण भागाकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेता शहरासाठी वेगळे पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत सर्व्हे करण्यात आला. लोकसंख्या, विस्तार आणि गुन्हेगारीचे प्रमाण याची आकडेवारी नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी पुरक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहादा शहरासाठीच्या नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करून तो पाठविण्यात आला आहे.
नवापूरही प्रस्तावीत
नवापूर शहराची हद्द ही गुजरातला लागून आहे. महामार्गा देखील येथून गेला आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारापेक्षा अधीक झाली आहे. शहराचा विस्तार वाढत आहे. नवीन एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग येत आहेत. त्यात परप्रांतीय कामगारांची संख्या वाढत आहे. नवापुरात देखीेल गेल्या काही वर्षात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. येथील पोलीस ठाण्यावर नवापूर शहर आणि अर्धा नवापूर तालुक्याचा भार आहे. त्यामुळे पोलिसांची मोठी कसरत होते. ही बाब लक्षात घेता नवापूर शहर आणि परिसरातील काही खेड्यांसाठी नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
नवीन पोलीस ठाण्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व बाबी येथे पुरक आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्याचा प्रस्ताव देखील गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
४नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत तीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये आहेत. त्यात नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा यांचा समावेश आहे.
४जिल्ह्यात १२ पोलीस ठाणे आहेत. याशिवाय एक शहर वाहतूक शाखा आहे.
४नंदुरबार उपविभागात नंदुरबार शहर, उपनगर व तालुका, विसरवाडी व नवापूर ही पोलीस ठाणी. शहादा उपविभागात शहादा, म्हसावद, सारंगखेडा, धडगाव तर अक्कलकुवा उपविभागात अक्कलकुवा, मोलगी व तळोदा ही पोलीस ठाणी आहेत.