स्वॅब संकलन केंद्रांवर हाैशींच्या गर्दीमुळे हरवतेय कोरोनाचे गांभीर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:35+5:302021-03-16T04:31:35+5:30
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने स्वॅब संकलन केंद्र गल्लोगल्ली सुरू करत नागरिकांची मोठी सोय करुन दिली आहे. यामुळे स्वॅब देण्यासाठी ...

स्वॅब संकलन केंद्रांवर हाैशींच्या गर्दीमुळे हरवतेय कोरोनाचे गांभीर्य
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने स्वॅब संकलन केंद्र गल्लोगल्ली सुरू करत नागरिकांची मोठी सोय करुन दिली आहे. यामुळे स्वॅब देण्यासाठी होणारे हेलपाटे कमी झाले आहेत. परंतु ही सोय काहीअंशी बघ्यांच्या गर्दीमुळे संसर्गाचे माहेरघर होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे या केंद्रांवर केवळ हाैस म्हणून गर्दी करणाऱ्यांवर आळा घालण्याची गरज आहे.
नंदुरबार शहरात जागोजागी रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केली जात आहे. यातून कोरोनाबाधित रुग्ण समोर येऊन संसर्ग रोखण्याच्या उपायांना आणखी गती देण्यात येईल, परंतु या केंद्रांवर अनेक जण केवळ स्वॅब कसा घेतात, रॅपिड टेस्ट कशी असते हे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे त्या केंद्रांवरचे सोशल डिस्टन्सिंग हरवल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स्वॅब संकलन केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांवर योग्य त्या पद्धतीने स्वॅब घेतले जात आहेत. नागरिकांनीच गांभीर्य पाळत आरोग्य विभागाला सहकार्य केले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग रोखता यावा यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे.
-डाॅ. एन. डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.
स्वॅब देण्याची तयारी होती. त्यानुसार केंद्रावर हजेरी लावली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वॅब संकलन केले आहे. या ठिकाणी बघ्यांची होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. एकावेळी एकानेच लसीकरणासाठी गेले पाहिजे. काहीजण मित्रांना सोबत आणतात.
-नागरिक, नंदुरबार,
स्वॅब संकलन केंद्रावर कर्मचारी सांगूनही त्या त्या भागातील विक्रेते व नागरिक काय सुरू आहे हे पाण्यासाठी गर्दी करतात. हे चुकीचे आहे. गर्दीमुळे ज्याला कोरोना नसेल त्यालाही त्याचा संसर्ग होण्याची भीती आहे. यामुळे दक्षता घेतली पाहिजे.
-नागरिक,नंदुरबार.
स्वॅब संकलन केंद्रांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वॅब घेणे ही एक प्रक्रिया असून एकावेळी एकानेच थांबावे असे आरोग्य कर्मचारी सांगत आहेत. दरम्यान, अनेक जण स्वॅब देतानाही स्वत:चा फोटो मित्राकडून काढून घेत असल्याचे यावेळी दिसून आले.