बोरद शिवारात बिबट्या दिसल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:52 IST2019-05-03T11:52:39+5:302019-05-03T11:52:59+5:30

महिन्यात तिसरी घटना : वनविभागाकडून उपाय योजना आवश्यक, ग्रामस्थ भयभित

Sensation caused by a leopard in Borad Shivar | बोरद शिवारात बिबट्या दिसल्याने खळबळ

बोरद शिवारात बिबट्या दिसल्याने खळबळ

बोरद : बोरद शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे़ वारंवार अशा प्रकारे बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवश्यकता आहे़
बोरद येथील शेतकरी कृष्णदास काशीनाथ पाटील यांनी आपल्या बोरद शिवारातील सर्वे नं २९० मध्ये टरबूज पिकांची लागवड केली आहे़ या टरबूज पिकाला फवारणी करण्यासाठी पाटील हे सकाळी सात वाजता शेतात पोहचले़ या वेळी कृष्णदास पाटील यांचा मुलगा सागर व तीन शेतमजूर यांनी पिकांवर फवारणी करण्यास सुरुवात करताच समोरुन बिबट्याचे दर्शन झाले़ बिबट्याला पाहताच कृष्णदास पाटील व सोबतच्या सहकाऱ्यांनी जागेवरच शेतीची साहित्या सोडून आपआपल्या घराकडे पळ काढला़ याबाबत संबंधितांनी इतर ग्रामस्थांना घटनेची माहिती दिल्यावर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना फोन करुन बोलवण्यात आले़
परंतु तोपर्यंत बिबट्याने तेथून पळ काढलेला होता़ या वेळी वनविभागाकडून फटाके फोडण्यात आले परंतु तरीदेखील बिबट्या बाहेर आला नाही़ त्यामुळे ग्रामस्थांकडून अधिकच भिती व्यक्त केली जात आहे़
परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने वारंवार हिंस्त्र प्राणी लोकवस्तीकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़ नुकतेच मोड शिवारातदेखील बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ त्यातच आता बोरद शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाल्याने ते चिंतेत आहेत़
परिसरात बिबट्यांसाठी ट्रॅप कॅमेरे लावावेत तसेच बिबट्याना पकडण्यासाठी पिंजºयाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे़ वनविभागाकडून परिसरात फटाके फोडून मिरचीचा धूर करण्यात येणार असल्याच्या उपाय योजना करण्यात येणार आहे़
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हलालपूर गावात बिबट्याकडून धुमाकूळ घालण्यात आला होता़ तळोदा तालूका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने परिसरातील अनेक गावांच्या शेतशिवारात बिबट्यासह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून येते. साधारणत: ऊस, केळी, यांच्यासारख्या पिकांमध्ये बिबट्या, तरस, अस्वल यांसारखे प्राण्यांच्या अधिवास असल्याचे सातत्याने निदर्शनात आले आहे. उसतोड पूर्ण होऊन अनेक शेते रिकामी झाली असल्याने अधिवास व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे़ हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने बचावासाठीच्या उपाययोजनाचे प्रशिक्षण शेतकरी व स्थानिक नागरीकांना वनविभागाकडून मिळणे गरजेचे आहे.

Web Title: Sensation caused by a leopard in Borad Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.