पहिल्या फेरीतील १४० विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:50 IST2019-04-12T18:50:25+5:302019-04-12T18:50:46+5:30
आरटीई प्रवेश : कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पालकांचा लागतोय कस

पहिल्या फेरीतील १४० विद्यार्थ्यांची निवड
नंदुरबार : आरटीईअंतर्गत पहिल्या प्रवेश फेरीत जिल्ह्यातील १४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे़ मदत केंद्रांमार्फत लवकरच संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती होणार आहे़
आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा रिक्त ठेवून मोफत प्रवेश देण्यात येत असतो़ याची महत्वाची प्रक्रिया सध्या राज्यात सुरु आहे़
राज्यभरातून आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या दुप्पट अर्ज आलेले आहेत़ राज्यातील आरटीई प्रवेशाच्या ९ हजार १९५ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ८९५ जागांसाठी राज्यभरातून २ लाख ४६ हजार २८ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ प्रत्यक्ष आरटीई जागांपेक्षा अर्ज जास्त असल्याने साहजिकच शिक्षण विभागाकडून ८ एप्रिल रोजी पुणे येथे याबाबत सोडत पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती़ या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील १४० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याचे संकेतस्थळावर दिसून येत आहे़
प्रवेशासाठी होणार धावपळ
८ एप्रिल रोजी शिक्षण विभागाकडून संपूर्ण राज्यातून आलेल्या आॅनलाईन प्रवेश अर्जांची सोडत काढली होती़ या पहिल्या सोडतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावे आली आहेत़ त्यांना पुढील कागदोपत्री तपासणी व प्रत्यक्ष प्रवेशासंबंधी कामे करावयाची आहेत़ पुणे येथून पहिल्या प्रवेश फेरीत निवडण्यात आलेली नावे जिल्हानिहाय त्या-त्या जिल्हा परिषदांना पाठविण्यात आलेली आहेत़ त्याच प्रमाणे संबंधित पालकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही शिक्षण विभागाकडून एसएमएसच्या सहाय्याने कळविण्यात आलेले आहेत़
जिल्ह्यातील १४० विद्यार्थ्यांची पहिल्या सोडतीमध्ये नावे निश्चित झाली असल्याने साजिकच आता प्रत्यक्षात कागपत्रांची तपासणी व शाळा प्रवेश निश्चितीसाठी पालकांची प्रचंड प्रमाणात धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे़
जिल्ह्यात एकूण ४७ शाळांमार्फत ४७० जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यंदा आरटीईसाठी ५७३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ क्षमतेपेक्षा केवळ १०३ प्रस्तावच जादा आले आहेत़ त्यातही अर्जांच्या छाननीनंतर किती विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरतात हे येणाऱ्या दिवसात समजणारच आहे़ परंतु अर्जांची आलेली संख्या बघता यंदाही आरटीईअंतर्गत जागांचा कोटा रिक्तच राहतोय की काय? असा प्रश्न पडत आहे़ पालकांनी आपल्या पाल्याची आरटीईअंतर्गत प्रवेश निश्चिती होण्यासाठी एकाहून अधिक शाळांना प्राधान्य दिलेले आहे़ पालकांकडून ठराविक ४ ते ५ शाळांना प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करण्यात आले असल्याची माहिती आहे़ त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण विभागाकडून पहिली प्रवेश फेरी जाहिर करण्यात येऊन १४० विद्यार्थ्यांच्या नावाची निवड करण्यात आली असली तरी, यातील प्रत्यक्ष किती पालक शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आपल्या पाल्याचा प्रवेश सूचित करण्यात आलेल्या शाळेत करतात, हे बघावे लागेल़ अनेक वेळा पसंतीची शाळा न मिळून दुसºयाच शाळेसाठी पाल्याची निवड करण्यात आल्याने संबंधित पालक नाराज होऊन वेळ पसंगी जादा फी भरण्याची तयारी ठेवतात़ व पाहिजे त्याच शाळेत प्रवेश घेत असतात़ त्यामुळे सुचवलेल्या संबंधित शाळेतील आरटीईचा कोटा रिक्तच राहत असतो़ त्यामुळे सोडतीनंतर किती विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होतो हे महत्वाचे राहणार आहे़ विद्यार्थ्यांची निवड झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या जवळील मदत केंद्रांवर कागदपत्र पडताळणी जाऊन प्रवेश निश्चिती करणे आवश्यक राहणार आहे़ सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर पालक व पाल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी संबंधित शाळेत पाठविण्यात येणार आहे़