वाळू वाहतूक करणारी सात वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:55+5:302021-02-08T04:27:55+5:30
परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीच्या कार्यपद्धती निश्चित करण्यासंदर्भात राज्य शासनाने ५ फेब्रुवारीला परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, परराज्यातून वाळू ...

वाळू वाहतूक करणारी सात वाहने जप्त
परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीच्या कार्यपद्धती निश्चित करण्यासंदर्भात राज्य शासनाने ५ फेब्रुवारीला परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, परराज्यातून वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या संगणकीय प्रणालीमध्ये नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परराज्यातील वैध मार्गाने येणाऱ्या वाळूची अनुज्ञप्ती क्षेत्रीय कार्यालयाने तपासून, त्या राज्यातून आलेली वाळू वैध परवानाद्वारे आल्याची खात्री करावी. संबंधित व्यक्ती किंवा संस्था स्वतःच्या वापरासाठी परराज्यातून आणलेला वाळूसाठा न करता, सरळ बांधकामाच्या ठिकाणी नेणार असल्यास सदर व्यक्ती किंवा संस्थेकडे त्या राज्यातील अवैध वाहतूक पास परिमाण असणे आवश्यक आहे, तसेच संबंधित व्यक्ती किंवा संस्था वाळूचा साठा विक्री करणार असल्यास, राज्य गौण खनिज उत्खनन नियमानुसार परवाना घेणे आवश्यक आहे. दरम्यान, परिपत्रक आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी तत्काळ पोलीस, महसूल व परिवहन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले तपासणी पथक नेमण्यात यावे, तसेच तत्काळ चेक नाके उभारण्याचे निर्देश दिले आहेत.
सात वाहने पकडली
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतर, येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत यांनी गुजरात राज्यातून येणाऱ्या सात वाळू वाहतुकीचे ट्रक पकडले, त्यात आयवासारख्या मोठ्या गाड्यांचाही समावेश आहे. (क्रमांक एम. एच १८- ए.झेड. ०९०९), (एम.एच.१८- बीए. ५२७७), (एम.एच. १८ ए.ए. ७९८३), (एम.एच.१५ सी.के.- ३४०), (एम.एच.१२- एन.एक्स.- २९९५), ( एम.एच.३९ सी.१५८५) एका वाहनाचा नंबर समजू शकला नाही. असे एकूण सात वाळूने भरलेले ट्रक जात असताना, पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी विचारपूस करीत पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या वाहनांची अद्याप चौकशी बाकी असून, सोमवारी चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे, परंतु या कारवाईमुळे वाळू वाहतूकदार चांगलेच धास्तावले आहेत.
शहादा तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होत असून, त्यासाठी प्रशासनाने चेक नाके उभारून कारवाई केल्यास शासनाच्या महसुलातही वाढ होईल, शिवाय अवैध वाळू वाहतुकीला निश्चितच लगाम बसेल.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये १० टक्के रक्कम
परराज्यातून रस्त्याने अथवा जलमार्गाने आणलेली वाळू महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करणार असेल, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या जिल्ह्यात संबंधिताने राज्य शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या स्वामित्वधन दराच्या १० टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये जमा करणे आवश्यक आहे. संबंधित रकमेचा भरणा केल्यानंतर, झीरो रॉयल्टी पास देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय कार्यवाही करेल. परराज्यातून आलेल्या वाळूचा साठा वैध परवान्यापेक्षा जास्त आढळल्यास किंवा झीरो रॉयल्टी पासशिवाय वाहतूक केलेली आढळल्यास, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार, दंडात्मक कारवाई होऊ शकते.
पोलीस विभागाने सात वाहने पकडल्याची माहिती आहे. त्यांची अद्याप चौकशी बाकी आहे. सोमवारी चौकशी करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल.
- डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा
शासनाच्या परिपत्रकानुसार वाळू वाहतूक करणारी सात वाहने प्रकाशा, ता.शहादा येथून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात जमा केली आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- दीपक बुधवंत, पोलीस निरीक्षक, शहादा