कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ एक हजार २०० जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:08+5:302021-07-01T04:22:08+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना महामारी असल्याने गेल्या दीड वर्षांपासून साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यातील कलम १८८ ...

कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ एक हजार २०० जणांवर गुन्हे दाखल
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना महामारी असल्याने गेल्या दीड वर्षांपासून साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यातील कलम १८८ नुसार नियमांचे उल्लंघन करत हिंडणाऱ्या १ हजार २०० जणांवर गेल्या दीड वर्षात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना न्यायालयाने दंड करून सोडून दिले होते.
साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सूचना देऊनही अनेक जण नियमांचे उल्लंघन करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते. यातून जिल्ह्यात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ च्या तरतुदींसोबतच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २६८, २६९ याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकट्या मे महिन्यात विविध कलमांखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून बेशिस्तांवर २८ हजार १६१ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ४२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मास्कचा वापर टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन यासह विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल आहेत.
नोंदण्या असल्याने अडचणी येत नाहीत
जिल्ह्यात १ हजार २०० गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर दंडाची शिक्षा सुनावल्यानंतर या नागरिकांना सोडून दिले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर साधारण हे गुन्हे दाखल केले जात आहेत. जिल्ह्यात यासोबतच कलम २६८, २६९ तसेच २९० प्रमाणेही कारवाई केली जाते. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची वेळ पोलिसांवर येणार नाही.
-महेंद्र पंडित,
पोलीस अधीक्षक, नंदुरबार
काय आहे कलम १८८
शासनाने १८९७ चा साथरोग नियंत्रण कायदा लागू केला आहे. या कायद्यातील कलम दोन, तीन आणि चार प्रमाणे कारवाई होते.
शासनाने साथरोग आटोक्यात आणण्यासाठी हा कायदा लागू केला आहे. यात गर्दी न करणे, सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे आदी नियमांचे उल्लंघन केल्यास अदखलपात्र गुन्हा दाखल होतो.
काय होऊ शकते शिक्षा
कायद्यानुसार आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.
दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले तर, त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.