दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील दीड हजारांपैकी ५०० जणांचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:18+5:302021-06-01T04:23:18+5:30
नंदुरबार : मार्च महिन्यापासून प्रारंभ झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ९० टक्के मृत्यू ...

दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील दीड हजारांपैकी ५०० जणांचा झाला मृत्यू
नंदुरबार : मार्च महिन्यापासून प्रारंभ झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ९० टक्के मृत्यू हे जिल्हा कोविड हाॅस्पिटलमध्ये झाल्याची माहिती आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने झाल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. गंभीर रुग्णांना वाचवता यावे यासाठी व्हेंटिलेटर्सचा वापर करण्यात आला होता. यातून ४० टक्के रुग्ण हे बरेही झाल्याचे समोर आले आहे.
जिल्हा रुग्णालयात मार्च आणि एप्रिल महिन्यात अत्यंत गंभीर स्थितीतील रुग्ण दाखल करण्यात येत होते. यातून कोविड हाॅस्पिटलमधील ४० व्हेंटिलेटर हे नियमित बिझी असल्याचे दिसून येत होते. यामुळे व्हेंटिलेटरची स्वच्छता होते किंवा कशी याबाबत विचारणा सुरू झाली होती. याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाहणी केली असता व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना लावण्यात येणारे मास्क हे सातत्याने स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जात होती. सुमारे १०० मास्क रुग्णालयाने खरेदी करून ठेवले आहेत. या मास्कची दरदिवशी स्वच्छता केली जात असल्याने रुग्णांना इतर रोगांचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
सोडियम हायपोक्लोराईने केली जाते स्वच्छता
व्हेंटिलेटरवरील एक रुग्ण काढल्यानंतर दुसरा रुग्ण त्यावर टाकण्यापूर्वी नवीन मास्क देण्यात येतो. जुना मास्क सोडियम हायपोक्लोराईडच्या सोल्युशनमध्ये भिजवून ठेवला जातो. त्याची चांगल्या प्रकारे स्वच्छता केली जाते.
जिल्हा रुग्णालयात ईटी ट्युब, ड्युमोडिफायरची याच सोल्युशनमधून स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या व्हेंटिलेटर्सचीही याच प्रकारे स्वच्छता करण्यात येते.
एकूण रुग्ण
३७४२१
उपचारानंतर बरे झालेले
३६०९७
व्हेंटिलेटर लावावे लागलेले रुग्ण
२५००
व्हेंटिलेटर लावल्यानंतर झालेले मृत्यू
५५०
जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक व्हेंटिलेटर्स असून त्यांची स्थिती चांगली असल्याची माहिती येथील सफाई कामगाराने दिली. सध्या चार ते पाच व्हेंटिलेटर्सचा वापर होत आहे.
नेत्र कक्षातील आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर्स कार्यरत आहेत. त्यांची दैनंदिन तपासणी करण्यात येत असल्याचे रुग्णांच्या नातलगांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पडून असलेले मशीन खराब होऊ नये यासाठी तांत्रिकी कर्मचारी मशीनची सातत्याने चाचणी घेऊन तपासणी करत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सवर दाखल रुग्ण बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सोडियम हायपोक्लोराईडच्या सोल्युशनमधून मास्क बुडवून स्वच्छ केले जातात. सर्व ४० व्हेंटिलेटर्स चांगल्या पद्धतीने ठेवले जात आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने त्यांची देखभाल होत आहेत.
-डाॅ. राजेंद्र चाैधरी, फिजिशिय, नंदुरबार.
जिल्हा रुग्णालयात असलेले सर्व व्हेंटिलेटर्स हे चांगल्या स्थितीत आहेत. गंभीर रुग्ण झाल्यास त्याला व्हेंटिलेटर लावण्याचा निर्णय घेतला जातो. यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही चांगली आहे. व्हेंटिलेटर लावल्यानंतरही संसर्ग अधिक असल्याने काहींचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासन साहित्याची सातत्याने काळजी घेत ते चांगले ठेवण्यावर भर देत आहे.
-डाॅ. आर. डी. भोये,
जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.