कोरोनाची दुसरी लाट; केवळ तीन महिन्यांत ७८३ जणांचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST2021-06-26T04:22:01+5:302021-06-26T04:22:01+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झाली असून जिल्हा रुग्णालयात केवळ ९ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. ...

कोरोनाची दुसरी लाट; केवळ तीन महिन्यांत ७८३ जणांचा झाला मृत्यू
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झाली असून जिल्हा रुग्णालयात केवळ ९ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनाची दाहकता कमी झाल्यानंतर आता खासगी रुग्णालये, तसेच बाहेरगावाहून कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांची नोंदणी सुरू झाली आहे. यातून मार्च ते मे या तीन महिन्यांत थेट ७७३ जणांचा बळी गेल्याचे समाेर आले असून एप्रिल महिन्यातील मृतकांची संख्या ही चारशेच्या घरात आहे.
जिल्ह्यात कोरोना मृत्यूचा दर हा २ टक्के झाल्यानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन प्लांट, वाढीव बेड निर्माण केल्याने मृत्यूचा दर नियंत्रणात आला आहे. यातून जून महिन्यात केवळ ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यूही प्रारंभीच्या काळातील आहेत. जून मध्यात मृत्यूंची संख्या शून्यावर आली आहे. यातून केंद्रीय पोर्टलवर जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या ही कमी होती. याची दखल घेत जिल्हा रुग्णालयाने खासगी रुग्णालयांना नोटिसा काढल्यानंतर मार्च ते मे दरम्यान झालेल्या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. सर्व तालुक्यांतील खासगी रुग्णालये, तसेच शासकीय रुग्णालयांमधून माहिती अपडेट केली जात असल्याने मार्च ते मे या तीन महिन्यांत जिल्ह्यात ७७३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोर्टलवर उपलब्ध झाली आहे.
जिल्हा
रुग्णालयात मृत्यू
n जिल्हा रुग्णालयात एप्रिल
२०२० मध्ये कोरोनामुळे
पहिला रुग्ण दगावला होता.
एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात १६८ जणांचा मृत्यू झाला आहे.
मार्च २०२१ मध्ये ८९, एप्रिल
२५२, मे १०२ तर जून महिन्यात
११ जणांचा मृत्यू झाल्याच्या
नोंदी आहेत.
खासगी
रुग्णालयात मृत्यू
खासगी रुग्णालयांमध्ये एकूण
४३ जणांचा एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान
मृत्यू झाला होता.
खासगी रुग्णालयातील पहिला मृत्यू हा जुलै महिन्यात नोंद केला गेला होता.
मार्च २०२१ मध्ये २३, एप्रिल १६५, तर मे महिन्यात ८१ जणांच्या मृत्यूच्या नोंदी आहेत.
महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक
जिल्हा रुग्णालयात एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात १०२ पुरुषांचा मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात कोरोनामुळे महिला मृत्यूची पहिली नोंद ही जुलै २०२० मध्ये झाली. या महिन्यात ११ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात ६५ महिलांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मार्च ते मे २०२१ या काळात ३०३ पुुरुषांचा, तर १७० महिलांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यात ७६ पुरुष, तर ५५ महिला, एप्रिल महिन्यात १३० पुरुष, तर ६७ महिला, मे महिन्यात ९७ पुरुष तर ४८ महिलांनी कोरोना उपचार अयशस्वी झाल्याने प्राण गमावले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना वय वर्ष २० ते ९० दरम्यानच्या नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी या काळात २० ते ३० वयोगटात दोन, ३१ ते ४० वयोगटातील तीन, ४१ ते ५० वयोगटातील १२ जणांचा, ५१ ते ६० वयोगटात ४२, तर ६१ पासून पुढील वयोगटातील १०८ अशा एकूण १६४ जणांचा मृत्यू झाला होता.
मार्च ते मे २०२१ या काळात २० ते ३० वयोगटात चार, ३१ ते ४० वयोगटातील ३३ जणांचा, ४१ ते ५० वयोगटात १०३ जण, ५१ ते ६० वयोगटात १३०, तर ६१ पेक्षा पुढील वयोगटातील २०३ असा एकूण ४७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट ही परिणामकारक ठरली होती. यातून नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून मार्च ते मे या काळात मृतकांची संख्या ही वेगाने वाढल्याचे दिसून येत आहे. यात महिला आणि पुरुष अशा दोघांचा समावेश आहे. सर्वाधिक मृत्यू हे जिल्हा कोविड हाॅस्पिटल अर्थात जिल्हा रुग्णालयात झाले आहेत. याठिकाणी ६४० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक : जिल्हा रुग्णालयात आजवर ६४० आणि खासगी रुग्णालयात ३२१ अशा एकूण ९६१ जणांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आतापर्यंत झाल्या आहेत. एकीकडे जिल्हा रुग्णालयात मृत्यूच्या नोंदी होत असताना खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेल्यांची संख्या मात्र समोर येत नव्हती.
खासगी रुग्णालयांकडून पोर्टलवर नोंद करण्याची कारवाई केली गेली नव्हती. यातून त्यांना नोटिसा काढण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. ९९ टक्के नोंदण्या पूर्ण झाल्या आहेत. यातून जिल्ह्यातील मयतांचा आकडा हा वाढतो आहे. -डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.