शिर्वे आश्रमशाळेत ११ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आठवडाभर शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:40+5:302021-03-16T04:31:40+5:30
शाळा व्यवस्थापनाने सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात ...

शिर्वे आश्रमशाळेत ११ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आठवडाभर शाळा बंद
शाळा व्यवस्थापनाने सुरुवातीला दोन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. गेल्या रविवारी आलेल्या अहवालात पुन्हा नऊ विद्यार्थ्यांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याचा अधिक प्रादुर्भाव पसरू नये म्हणून ही शाळा एक आठवडा बंद ठेवण्याची सूचना प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून सोमवारीच सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या अकरा विद्यार्थ्यांना शाळेतच एका खोलीत विलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र वैद्यकीय समुदाय अधिकारी यांचे पथक नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांना नियमित औषधे व तपासणी केली जात असून, विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी सांगितली आहे. ग्रामपंचायतीने आश्रमशाळेची इमारत परिसरात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
व्यवस्थापन समितीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय
आश्रमशाळेत तब्बल ११ विद्यार्थी कोरोना संसर्गाचे आढळून आल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सोमवारी बोलावली होती. सदर बैठकीत व्यवस्थापन समितीचे सचिव तथा मुख्याध्यापक ए. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळविले व दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. कोरोनाचा अधिक संसर्ग इतर विद्यार्थ्यांमध्ये वाढू नये, म्हणून सदस्यांनी शाळा बंद ठेवण्याची सूचना मांडली. सोमवारपासून एक आठवडा शाळा बंद ठेवण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी बैठकीत अध्यक्ष संजय लालसिंग पाडवी, उपाध्यक्ष संगीता लचेंद्र पाडवी, सहसचिव एच. एस. महाले, उंताबाई प्रताप पाडवी, भीमसिंग पाडवी, यशवंत वळवी, सर्जना वळवी, संगीता वळवी आदी उपस्थित होते.
तळोद्यात दुसऱ्या दिवशीही अँटिजन टेस्टबाबत जनजागृती
तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने व्यावसायिक, वाहनचालक व खासगी व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात अँटिजन टेस्ट करण्यावर भर देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने देण्यात आले होते. दुसऱ्या दिवशीही तहसीलदार गिरीश वाखारे, मुख्याधिकारी सपना वसावे, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी व्यावसायिकांचे कोरोना अँटिजन टेस्ट करण्याबाबत जनजागृती केली असून, शहरात तीन ठिकाणी पथक स्थापन केले आहे. त्यामुळे या टेस्टच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
नाला शासकीय आश्रमशाळेत कोरोना विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्याचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून एक आठवडा शाळा बंद ठेवण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.
अविशांत पांडा, प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा.