शाळा बंद, पण शैक्षणिक वर्ष होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:34+5:302021-06-16T04:40:34+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे शाळा बंद राहणार असल्या, तरी शैक्षिणक सत्राला सुरुवात होत आहे. शिक्षकांना पहिल्यादिवशी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ...

शाळा बंद, पण शैक्षणिक वर्ष होणार सुरू
नंदुरबार : कोरोनामुळे शाळा बंद राहणार असल्या, तरी शैक्षिणक सत्राला सुरुवात होत आहे. शिक्षकांना पहिल्यादिवशी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेणे, शाळा सॅनिटाईझ करून घेणे यासह इतर शैक्षणिक कामे करावी लागणार आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षणालादेखील सुरुवात करावी लागणार आहे. दरम्यान, सलग दुसऱ्यावर्षी शाळेच्या पहिल्यादिवशी घंटा वाजणार नाही, बालकांचा किलबिलाट पहिल्यादिवशी ऐकू येणार नसल्याचे स्पष्ट आहे.
यंदाच्या शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होत आहे. शासनातर्फे शाळा सुरू करण्यासंदर्भात काहीही सूचना नसल्या, तरी जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी सर्व शाळा मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
पाठ्यपुस्तक मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याची लिंक सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल या दृष्टीने नियोजन करावे व त्यानुसार शिक्षण देण्यास सुरुवात करावी. ऑनलाईन शिक्षण देताना सर्व शिक्षकांनी शालेय वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहून इयत्ता व विषयनिहाय शिक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करावा.
ज्या शाळांमध्ये आकांक्षित जिल्हा व अन्य योजनेतून बांधकाम, दुरूस्ती प्रस्तावित करण्यात आली असेल, त्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी संबंधित यंत्रणेकडून प्रथम प्राधान्याने कार्यवाही करून घ्यावी. कोरोना लसीकरणासंदर्भात एकही पात्र लाभार्थी आपल्या शाळेच्या गावात वंचित राहणार नाही, याचे नियोजन करावे.
यासाठी संबंधित सरपंच, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका व गावातील नागरिकांचे सहकार्य घ्यावे. पावसाळा सुरू होणार असल्याने वृक्षारोपणासाठीदेखील पुढाकार घ्यावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.