आठ महिन्यांनी वाजली शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:33 PM2020-11-24T13:33:50+5:302020-11-24T13:33:57+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तब्बल आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील नववी ते १२ वीच्या शाळांचा घंटा वाजला. पहिल्या दिवशी ...

The school bell rang eight months later | आठ महिन्यांनी वाजली शाळेची घंटा

आठ महिन्यांनी वाजली शाळेची घंटा

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  तब्बल आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील नववी ते १२ वीच्या शाळांचा घंटा वाजला. पहिल्या दिवशी शहरी भागातील शाळांमध्ये बऱ्यापैकी तर ग्रामिण भागातील शाळांमध्ये शुकशुकाट जाणवला. अकरावीच्या विद्यार्थ्यांचा काॉलेजचा पहिला दिवस असल्याने अनेकांनी उत्सूकता म्हणून देखील काॉलेजला हजेरी लावली. प्रत्येक शाळेने कोरोनाच्या पाश्वभूमीवर आवश्यक ती उपाययोजना केली      होती. 
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्ह्याधिकारी यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षण विभागाला आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देखील दिले होते. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत. सर्व संबधीत शाळांमध्ये वर्ग खोल्यांचे निर्जंतूकीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर देखील आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालकांनी देखील आपल्या पाल्यांना शाळेत जाऊ देण्यास अनुमती दिली. परंतु अनेक शाळांमध्ये निम्मे देखील उपस्थिती नसल्याचे चित्र होते. 
माध्यमिकला तुरळक तर उच्च माध्यमिकला ब-यापैकी उपस्थिती
नववी व दहावीच्या वर्गात शहरी व ग्रामिण भागात तुरळक उपस्थिती होती. तर अकरावी व बारावीच्या वर्गांमध्ये ५० ते ६० टक्के उपस्थिती दिसून आली. अकरावी म्हणजे काॅलेजचे पहिले वर्ष. कॅालेजचा पहिला दिवस  यंदा विद्यार्थी साजरा करू शकले नाही. आज कोरोनाचा काळात का न होवो व विविध बाबींचे बंधन का न होवो परंतु अकरावीच्या विद्यार्थ्यांनी कॅालेजचा पहिला दिवस अनुभवला, त्याचा आनंद देखील घेतला. त्यामुळे इतर वर्गांच्या तुलनेत अकरावीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या अधीक असल्याचे चित्र होते. 
नववी व दहावीच्या वर्गात दहावीचे विद्यार्थी अधीक दिसून आले. तर नववीच्या वर्गांमध्ये तुरळक उपस्थिती होती. येत्या काही दिवसात चित्र बदलेले अशी अपेक्षा काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. 
पॅाझिटिव्ह शिक्षकांमुळे परिणाम
ज्या शाळेतील शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आले त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत काही शाळांनी सक्ती केली नाही. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसून आली. नंदुरबारातील तीन शाळांमध्ये तर शुकशुकाट होता. विद्यार्थीच आले नसल्याने शिक्षक देखील बसून होते. 
विविध उपाययोजना
शाळांतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. शाळेच्या गेटवर थर्मल स्कॅनरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत होती. सोबत ऑक्सीमिटर देखील ठेवण्यात आले होते. गेटमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ करण्यास सांगण्यात येत होते. काही शाळांनी हॅण्डवाॅशच्या ठिकाणी जंतूनाशक साबणांची देखील व्यवस्था केली     होती.  
विद्यार्थ्यांना अनावश्यक ठिकाणी हात न लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेऊन एकमेकांशी बोलणे, तोंडाला मास्क किंवा रुमाल सक्तीने बांधणे अशा सुचना देण्यात येत होत्या. जे विद्यार्थी बाहेर गावाहून आले असतील त्यांना आवश्यक ती काळजी घेण्यास सांगण्यात येत होते. 
पहिल्या दिवशी अध्यापनाचे काम फारसे झाले नाही. विद्यार्थ्यांना एकुण अभ्यासक्रम, आतापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून झालेले अध्यापन याविषयी चर्चा झाल्या. दहावी व बारावीचे अध्यापनाचे काम काही ठिकाणी सुरू झाल्याचे चित्र होते. 
शिक्षणाधिकारींनी घेतला क्लास
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा.मच्छिंद्र कदम, उपशिक्षणाधिकारी डॅा.युनूस पठाण यांनी शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या. कदम यांनी  मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक त्या सुचना देऊन केलेल्या उपाययोजनांची पहाणी केली. शहरातील शाळेतील एका वर्गात गणिताचा तास सुरू असतांना त्यांनी थेट गणिताचा संबधीत धडाच शिकविण्यास घेतला. थेट शिक्षणाधिकारीच शिकवत असल्याने विद्यार्थी देखील भारावले. बहुतांश विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून जोडले आहेतच. आता त्यांनी प्रत्यक्ष शाळेचा अनुभव घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत होता.

तालुकानिहाय शाळा व सुरू झालेल्या शाळा...

  • नंदुरबार तालुक्यात एकुण १०९ शाळा असून त्यापैकी ८७ शाळा सुरू झाल्या. त्यात एकुण १,६४६ विद्यार्थी उपस्थित होते.  
  • शहादा तालुक्यात एकुण ९५ शाळांपैकी ५५ शाळा सुरू झाल्या. त्यात एकुण ४७० विद्यार्थी उपस्थित होते.
  • तळोदा तालुक्यात २८ शाळांपैकी २७ शाळा सुरू झाल्या. त्यात २६७ विद्यार्थी उपस्थित होते. 
  • नवापूर तालुक्यता ३६ शाळा आहेत. त्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी संख्या उपलब्ध होऊ शकली नाही.
  • अक्कलकुवा तालुक्यात ३३ शाळांपैकी ३२ शाळा सुरू होत्या. त्यात ३८३ विद्यार्थी उपस्थित होते.
  • धडगाव तालुक्यात १३ शाळांपैकी १३ शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी संख्या उपलब्ध होऊ शकली नाही. 
     

Web Title: The school bell rang eight months later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.