देखावे, मिरवणुकांना यंदा फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:46 IST2020-08-11T12:46:25+5:302020-08-11T12:46:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या गणेशोत्सवाची भव्यदिव्यता कोरोनामुळे झाकाळली जाणार आहे. राज्य शासनाचे आवाहन, स्थानिक प्रशासनाने मंडळांना घातलेली ...

Scenes, processions split this year | देखावे, मिरवणुकांना यंदा फाटा

देखावे, मिरवणुकांना यंदा फाटा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाच्या गणेशोत्सवाची भव्यदिव्यता कोरोनामुळे झाकाळली जाणार आहे. राज्य शासनाचे आवाहन, स्थानिक प्रशासनाने मंडळांना घातलेली साद यामुळे अनेक मंडळे यंदा अगदी साधेपणाने उत्सव साजरा करणार आहे. काही मंडळांनी तशी घोषणा देखील केली आहे. दरम्यान यंदा गणेश मंडळांची संख्या रोडावणार असल्याचे चिन्हे आहेत. अद्यापपर्यंत मोजक्याच मंडळांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला आहे.
कोरोनाने यंदा सार्वजनिक उत्सवांमधील उत्साहाला देण्यास भाग पाडले आहे. गेल्या पाच महिन्यातील सर्वच उत्सव व धार्मिक कार्यक्रमांना त्याच फटका सहन करावा लागला आहे. आता सर्वाधिक चैतन्य आणि उत्साहाचा असलेल्या गणेशोत्सवाला देखील कोरोनामुळे काही प्रमाणात फाटा द्यावा लागणार आहे. सामाजिक भान राखत काही मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवून घेतले आहे.
गणेशमूर्ती उंचीची मर्यादा
यंदा गणेश मूर्तीची उंची कमाल चार फुटापर्यंत ठेवण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्याअंतर्गत तसा नियमही घालून दिला आहे. त्यामुळे नंदुरबारातील सार्वजनिक गणेश मंडळांची उंच मूर्तीची परंपरा यंदा खंडित करावी लागणार आहे. किमान पाच फूट ते जास्तीत जास्त २० फुटापर्यंत मूर्ती स्थापन करण्याची येथील मंडळांची परंपरा आहे. मंडळांमध्ये यासाठी स्पर्धाही असते. परंतु यंदा उंच मूर्तीला फाटा द्यावा लागणार आहे.
सजावट आणि देखावेही नाही
यंदा गणेश मंडळांनी सजावट आणि देखावे याबाबतही उदासिनता दाखविली आहे. सजावट आणि देखावे उभारल्यास ते पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आणि कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवावे लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे देखाव्यांबाबतही यंदा कुणीही मंडळ पुढाकार घेतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांचे मंडपाच्या ठिकाणी महिनाभर आधीपासूनच तयारी सुरू होत असते. परंतु यंदा अवघ्या १७ दिवसांवर बाप्पांचा उत्सव येऊन देखील कुणीही मंडळ त्यासाठी पुढाकार घेतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. देखाव्यांसोबत सजावटीलाही यंदा फाटा दिला जाणार आहे. भव्यदिव्य मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई देखील मोजकेच मंडळे करणार असल्याची स्थिती आहे.
मिरवणुका रद्द?
गणेशोत्सवातील स्थापना आणि विसर्जनाच्या मिरवणुकाही यंदा रद्द करण्यात याव्या असे आवाहन याआधीच प्रशासनाने केले आहे. मिरवणुकांमधील होणारी गर्दी लक्षात घेता हे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबारातील दादा व बाबा यासह इतर मानाच्या गणपतींची मिरवणूक साध्यापणाने काढली जाणार आहे. या दोन मानाच्या गणपतींची हरिहर भेट बाबत काय निर्णय होतो याकडे आता भक्तांचे लक्ष लागून आहे.
अनेकाच्या व्यवसायाला फटका
गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करण्याच्या निर्णयामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लागणारा मंडप, सजावटीसाठी लागणारे साहित्य, विद्युत रोषणाई, ढोल व लेझीम पथके, डिजे चालक-मालक, यासह गुलाल विक्री यावरही मोठा परिणाम होणार आहे. आधीच हे व्यवसाय ठप्प आहेत.
लॉकडाऊनमुळे यंदा या व्यावसायिकांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागला आहे. आता गणेशोत्सवातही त्यांना व्यवसाय मिळणार नाही हे स्पष्टच आहे.


नंदुरबारात मोठी सजावट, देखावा आणि भव्यदिव्य मिरवणुका काढणाऱ्या मंडळांपैकी माळी समाज पंच मंडळ देखील त्यातील एक आहे. या मंडळाने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे. पंच कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार यंदा सार्वजनिक गणेशोत्सव हा स्थापना व विसर्जन मिरवणुकीचे आयोजन न करता, गुलालाचा वापर न करता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना प्रमाणेच साजरा करणार असल्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देवून कळविले आहे. अध्यक्ष आनंद माळी, माणिक माळी, विजय माळी, मोहन माळी, निंबा माळी, लक्ष्मण माळी यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी देखील घेणे अपेक्षीत असल्याचे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Scenes, processions split this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.