Satpudya's rising distance from 'bamboo' | सातपुडय़ाचा ‘बांबू’पासून वाढता दुरावा

सातपुडय़ाचा ‘बांबू’पासून वाढता दुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दैनंदिन वापरासाठी असलेल्या अगदी छोटय़ाच्या वस्तूंपासून घर बांधण्यार्पयत प्रत्येक बाबींमध्ये बांबूचा वापर केला जातो. त्यामुळे सातपुडय़ातील आदिवासी बांधवांसाठी बांबू हा अविभाज्य घटक ठरतो. परंतु आधुनिकतेमुळे या पारंपरिक जीवनपद्धतीपासून आदिवासींचा दुरावा निर्माण होत आहे. ही बाब या संस्कृती सेवर्धनासाठी बाधक असल्याची खंत तेथील ज्येष्ठांकडून व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, अशाच वस्तुंसह अन्य बाबींचा अवलंब करणारा सातपुडय़ातील आदिवासी बांधव परंपरेनुसार त्यांच्या जीवनात बांबूपासून निर्मित सर्वाधिक वस्तू वापरत आला आहे, बांबूलाच अधिक महत्व दिले गेले आहे. म्हणूनच आदिवासींची नाळ निसर्गाशी जुळत असल्याचे म्हटले जाते. ही जीवन पद्धती समाजजीवनात वेगळा ठसा उमटवत असून याच पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे मत सातपुडय़ातील ज्येष्ठांमार्फत व्यक्त केले जात आहे. परंतु आधुनिकतेमुळे या पद्धतीपासून आदिवासींचा दुरावा निर्माण होत असल्याची खंतही ज्येष्ठांमार्फत व्यक्त केली जात आहे. 
बांबूचा झाडू-खराटापासून घर उभारणे, धान्याच्या कोठय़ा, कडबा साठवण्यासाठी कोठार, विविध प्रकारच्या टोपल्या, पारंपारिक वाद्ये, मासे मारण्याची साधने यासह अनेक साहित्य बनविले जात आहे. त्याचा धागा म्हणूनही वापर होत असल्याने त्यांच्यासाठी बांबू ही वनस्पती जीवनातील अविभाज्य घटक ठरते. 
पशुधनाला वर्षभर पुरेल इतका कडबा विविध पिकांपासून तयार केला जातो. परंतु मर्यादित घरांमुळे बहुतांश पशुपालक बांबूपासून कोठार तयार करीत त्यात कडबा साठवत असतात. त्याला सातपुडय़ातील बोलीभाषेत ‘हाटा’ असे म्हटले जाते. हे कोठार पूर्णत: बांबूपासून तयार केले जात असून त्यात पावसाचे पाणी जाऊ नये, वादळ - वा:यातही सुरक्षीत राहावे, यासाठी त्याला विशिष्ट आकार दिला जातो. त्यामुळे त्यात साठवलेला चारा अथवा कडबा वर्षभर काहीही होत नाही. खेळती हवा राहत असल्याने कडब्याला बुरशीही लागत नाही. हे तंत्रज्ञान सातपुडय़ातील आदिवासींना एखाद्या तज्ञाने शिकवले नसून ही पूर्वजांची देणगी ठरते. पहाडातील जीवन पद्धतीतील अन्य काही घटकाच्या दृष्टीनेही असेच म्हटले जात आहे. पूर्वजांचे हे ज्ञान आताच्या आदिवासींनी घेतले नाही. शिवाय आधुनिकतेमुळे त्याला पर्यायी साधने उपलब्ध होऊ लागल्यामुळे आदर्शवत असूनही या पद्धतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे सातपुडय़ात या कोठारांचे  अत्यल्प प्रमाण दिसून येत आहे. या पद्धतीपासून आताचा आदिवासी बांधव दुरावत चालल्यामुळे ही पद्धतच कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. येत्या कालावधीत यातील काही भाग लोप पावलेला असेल. याबाबत आताच्या शिकणा:या मुलांच्या मानसिकतेवर ज्येष्ठांकडून खंतही व्यक्त केली जात आहे. 

घराचा कुड हा बांबूपासून तयार केला जात असून या कुडामुळे घरात कुठल्याही वातानुकुलीत विद्युत उपकरणांची आवश्यकता भासत नाही. शिवाय सुर्य उगवणे व मावळण्याचा अचुक अंदाजही कुडामुळे घेता येतो, घडय़ाडाचा फारसा अवलंब होत नाही. घरातला माळा पूर्णत: बांबूचा असून छत हे कौले, आधारासाठी दांडय़ासह बांबूपासूनच तयार केले जाते. तर घर बांधण्यासाठी दोरचा वापर न करता बांबूपासून काढलेल्या बातळी धागाच वापरला जातो. त्यामुळे घर मजबूत राहत असून घराचे साहित्य वाटेल तेव्हा काढता येते , त्यामुळे हे घर पूर्णत: पर्यावरणपुरक ठरते.

आज असंख्य आदिवासी शिकून मोठ-मोठय़ा पदांवरील जबाबदा:या सांभाळत आहे, ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु हे केवळ आधुनिक शिक्षणच घेत गेले. पारंपरिक जीवनपद्धतीत अनेक बाबी आदर्श असूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शिकले असले तरी पारंपरिक ज्ञानाबाबत ते अज्ञानच असल्याचे मत ज्येष्ठ व्यक्त करीत आहे
 

Web Title: Satpudya's rising distance from 'bamboo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.