जयनगर परिसरात समाधानकारक पावसाने पिके तरारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST2021-07-26T04:27:48+5:302021-07-26T04:27:48+5:30
जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील ...

जयनगर परिसरात समाधानकारक पावसाने पिके तरारली
जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, बऱ्यापैकी उत्पन्न निघेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये पल्लवित झाली आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी मोठ्या पावसाअभावी नदी-नाले, ओढे कोरडे असून, जयनगरसह परिसरात मोठ्या पावसाची अत्यंत आवश्यकता असून, विहिरींची पातळी खालावलेली आहे.
हंगामाच्या सुरुवातीला शहादा तालुक्यात जयनगरसह परिसरात एकच चांगला पाऊस झाला होता. नंतर पावसाने खूप दिवस विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार लागवड व पेरणीला सामोरे जावे लागेल होते. मात्र दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे आणि आता शनिवारी आणि रविवारी पडलेल्या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला निंदणी व कोळपणी करून रासायनिक खताची मात्रा दिली होती. तसेच पिकांवरील कीड आणि विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली होती.
दोन दिवसांच्या पावसाने पिके बहरली असली तरी जयनगरसह तालुक्यात अद्याप मोठ्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. कारण जुलै महिना संपत आला तरी नदी-नाले वाहत नसल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधील विहिरी तसेच कूपनलिकांची पाणीपातळी खालावलीच आहे. जयनगरच्या पूर्वेला आमराई नदी आणि पश्चिमेला म्हैस नदी असून, या नद्यांना पाणी आले तरच जयनगरसह धांद्रे, निंभोरे, बोराळे, कुकावल, कोठली, वडाळी येथील विहिरी तसेच कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे परिसरातील शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.