सैताण्याचे पाच जण क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:15 IST2020-06-24T12:15:49+5:302020-06-24T12:15:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील सैताणे येथे गुजरात राज्यातील सुरत येथून येऊन परत गेलेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ...

सैताण्याचे पाच जण क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील सैताणे येथे गुजरात राज्यातील सुरत येथून येऊन परत गेलेल्या एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे़ संबधित रुग्णावर सुरत येथे उपचार सुरु असल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने गावात भेट देत पाच जणांना नंदुरबारात तर तिघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़
सैताणे येथील एक जण सुरत येथे नोकरी निमित्त स्थायिक आहे़ सहा दिवसांपूर्वी संबधित आईच्या उपचारांसाठी गावी आला होता़ आईची एन्जिओप्लास्टी करण्यात आल्यानंतर तो परत गेला होता़ येथून परत गेल्यानंतर त्याला सुरत येथे त्रास सुरु झाल्यानंतर स्वॅब रिपोर्ट घेण्यात आला होता़ तो पॉझिटिव्ह आल्यानंतर तेथील प्रशासनाने ही बाब नंदुरबार तालुका प्रशासनाला कळवली होती़ त्यानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ जे़एच़तडवी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी सैताणे गावात भेट देत माहिती घेतली होती़ याठिकाणी संबधित कोरोनाबाधिताच्या अती संपर्कात आलेल्या पाच जणांना तातडीने नंदुरबार येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते़ गावातील आणखी तिघांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ दरम्यान दुपारी याठिकाणी तालुका प्रशासनाच्या सूचनेनंतर तातडीने फवारणी करण्यात आली़ संपूर्ण गाव क्वारंटाईन करण्याऐवजी बाधित रुग्णाच्या घराच्या परिसर सील करण्यात आला़ नागरीक बॅरीकेड करुनही ते ओलांडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून या भागात काटे लावण्यात आल्याचे दिसून आले़
दरम्यान क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची प्रकृती चांगली असून गावात सर्वेक्षण मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ या पाच जणांच्या संपर्कात आलेल्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाकडून दोन ते तीन वेळा फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़