Sarangkheda village closed for three days | सारंगखेडा गाव तीन दिवस पूर्ण बंद

सारंगखेडा गाव तीन दिवस पूर्ण बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील मालेगाव रिटर्न झालेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्याशी संपर्कात असलेले कर्मचारी, अधिकारी व निकटवर्ती अशा १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस ग्रामपंचायतीने गावातील अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने वगळता गाव पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन पशुसंवर्धन दवाखाना, कर्मचारी निवासस्थान व परिसर सील करण्यात आला आहे.
सारंगखेडा येथील पशूवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी हे मालेगाव येथील रहिवासी असून ते येथे कार्यरत आहेत. ते सध्या मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून सारंगखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला सील करण्यात आले आहे. पशुधन विकास अधिकारी हे २९ मे रोजी सकाळी आपले कर्तव्य बजावण्यासाठी सारंगखेडा येथील दवाखान्यात दीड तास थांबल्यानंतर सहायक पशूधन विकास अधिकारी व परिचर या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले. नंतर त्यांच्या शहादा येथील रूमवर मुक्कामी राहिले. तेथे त्यांचे रूम पार्टनर वैजाली येथील पशुधन विकास अधिकारी त्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. रात्री त्यांना मालेगाव येथून कटुंबीयांनी भ्रमणध्वनीवर तुमचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजले. मुलीची तब्येत खराब झाली असल्याचे सांगून संबंधित पशूधन विकास अधिकारी ३० मे रोजी सकाळीच आपल्या मोटरसायकलने मालेगावकडे निघाले. त्यानंतर आरोग्य विभागाकडून त्यांच्या संपर्कातील १० लोकांना मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जण स्वत:हून त्याआधी क्वारंटाईन कक्षात दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच सुशीलाबाई मोरे, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, ग्रामसेवक मडळे आदींनी पशुवैद्यकीय दवाखाना व कर्मचारी निवासस्थाने सील करून पाहणी केली.
सारंगखेडा येथील पशुसंवर्धन दवाखाना, कर्मचारी निवासस्थान सील करण्यात येऊन त्याचा परिसरही काटेरी झुडपे टाकून बंद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडून पशुसंवर्धन दवाखाना परिसरासह संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाकडून ३ ते ५ मे दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता गाव पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, केशकर्तनालय पुढील आदेश येईपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सरपंच सुशिलाबाई मोरे यांनी केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, ग्रामविकास अधिकारी मंडळे, ग्रामविस्तार अधिकारी सूर्यवंशी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सारंगखेडा, ता.शहादा येथील पशूवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकाºयाचा प्राथमिक तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याची प्राथमिक माहिती सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन यांना देणे अनिवार्य होते. परंतु तसे न करता त्यांच्या संपर्कात असलेल्या १० व्यक्तींना क्वारंटाईन करून मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. काही लोक स्वत:हून दाखल झाले तर काहींना रात्री उशिरा क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्यात कोणतीच लक्षणे आढळून येत नसल्याने दोन-तीन दिवसात त्यांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी दिली.

Web Title: Sarangkheda village closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.