सारंगखेड्यात एकाच रात्रीत दोन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 20:51 IST2019-04-22T20:51:09+5:302019-04-22T20:51:27+5:30
दीड लाखाचा ऐवज लंपास : श्वानपथकाने काढला माग

सारंगखेड्यात एकाच रात्रीत दोन घरे फोडली
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकाच रात्रीत दोन घरे फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला़ रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास झाल्याची माहिती असून पोलीसांकडून सकाळी श्वानपथक बोलावून चोरट्यांचा माग काढण्यात आला़
सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर माजी सैनिक छत्रसिंह भुरेसिंह गिरासे यांचे घर आहे़ शनिवारी रात्री उकाडामुळे गिरासे कुटूंबिय घरासमोर झोपले होते़ दरम्यान रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास केसरबाई गिरासे घरात जाण्यासाठी उठल्या, यावेळी दरवाजाला आतून कडी लावल्याने तो उघडत नव्हता त्यांनी पती छत्रसिंह यांना माहिती दिल्यावर दोघांनी दुसऱ्या दरवाजाने प्रवेश करत घरात पाहिले असता मागील दरवाजा उघडा दिसला़ त्याठिकाणी घरातील पत्र्याची पेटी फेकलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली़ त्यातील १४ हजार रुपये रोख आणि २७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले़ गिरासे यांच्या घरातून एकूण ८८ हजाराचा ऐवज लंपास झाला़
दरम्यान गावातील ग्रामपंचायत चौकातील शिवदास गुरव यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आतील कपाटात ठेवलेले ४५ हजार रुपये चोरुन नेले़ गुरव दाम्पत्य विवाहानिमित्त बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते़ सकाळी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ याप्रकरणी छत्रसिंग गिरासे व शिवदास गुरव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल आहे़