कोरोनामुळे फटाक्यांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:48 IST2020-11-13T12:48:43+5:302020-11-13T12:48:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  कोरोनाचा प्रादुर्भाव, राज्य सरकाने केलेले आवाहन आणि इतर कारणांमुळे यंदा फटाके फोडण्यावर मर्यादा येणार ...

Sankrant on firecrackers due to corona | कोरोनामुळे फटाक्यांवर संक्रांत

कोरोनामुळे फटाक्यांवर संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  कोरोनाचा प्रादुर्भाव, राज्य सरकाने केलेले आवाहन आणि इतर कारणांमुळे यंदा फटाके फोडण्यावर मर्यादा येणार आहेत. विक्रेत्यांनी देखील यंदा कमी फटाके विक्रीसाठी ठेवल्याचे चित्र आहे. मालाचा शाॅर्टेज असल्यामुळे भावदेखील काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
नंंदुरबार शहरात कचेरी मैदानावर फटाके विक्रेत्यांना स्टाॅल लावण्यासाठी परवानगी देण्यात येते. यंदा देखील गेल्या वर्षाइतकेच अर्थात ३० ते ३२ स्टाॅल लागले आहेत. त्याद्वारे फटाके विक्री होत आहे. यंदा फटाक्यांबाबत उदासीनता दिसून येत आहे.
कोरोनामुळे फॅक्टरी बंद
कोरोनामुळे तीन ते चार महिने फटाका निर्मिती कारखाने बंद होते. त्यामुळे वेळेवर फटाके तयार होऊ शकले नाहीत. त्यामुळे यंदा कमी प्रमाणात फटाके निर्मिती झाली      आहे. त्यामुळे फटाक्यांच्या पुरवठा वेळेवर आणि पुरेसा होऊ शकला नसल्याचे चित्र आहे. फटाके       निर्मिती कारखान्यांनी दरवर्षापेक्षा ३० ते ३५ टक्के माल कमी तयार केला आहे.
भाव काही प्रमाणात वाढले
फटाक्यांचे भाव यंदा काही प्रमाणात वाढवावे लागले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अपेक्षित व मागणीप्रमाणे माल मिळत नाही. त्यामुळे आहे त्या मालावर व्यवसाय करावा लागणार आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे ग्राहकांना तो द्यावा लागणार असल्यामुळे १० ते १५ टक्के भाववाढ करावी लागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
शोभेच्या फटाक्यांना मागणी
यंदा आवाज करणारे फटाके फोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा फटाक्यांमुळे वायू व ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे कोरोना रुग्णांना किंवा ज्यांना कोरोना होऊन गेला, परंतु अद्यापही काही प्रमाणात त्रास जाणवत असेल अशा रुग्णांना त्यापासून धोका   निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आवाज करणारे फटाक्यांना मागणी कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी शोभेच्या फटाक्यांना यंदा मागणी वाढल्याचे सांगण्यात आले.
स्टाॅलधारकांना नियम
विस्फोटक नियमानुसार स्टाॅल धारकास दारू/फटाकेसाठी १०० कि.ग्रा.व शोभेचे चकाकणारे चायनिज फटाक्यांसाठी ५०० कि.ग्रा.एवढा परिणामापेक्षा जास्त परिणाम   बाळगता येणार नाही. तात्पुरते फटाके विक्री स्टॉलची संख्या एकाच    ठिकाणी एकापेक्षा जास्त असल्यास दोन स्टॉलमधील अंतर तीन मीटरपेक्षा कमी नसावे. तसेच बाहेरील सुरक्षित अंतर ५० मीटर असल्यास दोन स्टॉलमधील अंतर तीन मीटरपेक्षा कमी नसावे.
बाहेरील सुरक्षित अंतर ५० मीटरपर्यंतचे व अशी स्टॉल दोनपेक्षा अधिक रांगेत असल्यास ती समोरा समोर ५० मीटरपेक्षा कमी अंतराची नसावी. प्रत्येक स्टॉलमधील फटाक्याची एकूण परिमाणता ४५० कि.ग्रा.पेक्षा अधिक नसावी. प्रत्येक स्टॉलचे क्षेत्र १० ते २० चौ.मी.पर्यंतचे असावे. एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगांमधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत व ते मागील बाजूने बंद असावे. फटाका विक्री स्टॉलमध्ये अग्नी उपद्रवास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तू/बाबी प्रतिबंधित असतील.
फटाका विक्री स्टॉलच्या    परिसरात धूम्रपान प्रतिबंधित असेल. फटाका विक्री स्टॉलच्या ठिकाणी अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात असावी. अनपेक्षित घटना घडू नये म्हणून फटाका स्टॉलच्या परिसरात/ ठिकाणी दक्षता पथकाची गस्ती असावी. आपटून फुटणारे      फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही.

विदेशी फटाके नको 
दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.
 विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे   उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे  आणि त्याची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय आहे. 
 विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी बाळगू नये. 
 त्याचा साठा करत असेल किंवा विक्री करत असल्यास नागरिकांनी त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे. 

यंदा विक्रीवर होणार  ४० टक्के परिणाम...
यंदा फटाक्यांबाबत विविध संघटना, राज्य शासन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्या धर्तीवर अनेकांनी सामुहिक प्रतिज्ञा देखील घेतल्या आहेत. त्याचा परिणाम फटाके विक्रीवर झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे यंदा दरवर्षापेक्षा ३५ ते ४० टक्के कमी प्रमाणात फटाके विक्री होण्याचे चित्र आहे. त्यादृष्टीनेच व्यावसायियकांनीही माल भरला आहे. 

कोरोना व इतर कारणांमुळे यंदा फटाके विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात फटाके निर्मितीची कारखाने बंद होती. त्यामुळे मालाचा शाॉर्टेज आहे. त्यामुळे भाव देखील काही प्रमाणात वाढले आहेत. यंदा आवाज करणार-या फटाक्यापेक्षा शोभेच्या फटाक्यांना मागणी आहे.
-रोहित साबळे, फटाके विक्रेता.

Web Title: Sankrant on firecrackers due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.