रांझणी ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:49 IST2019-09-25T12:49:04+5:302019-09-25T12:49:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ग्रामपंचायतीकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन ...

रांझणी ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील ग्रामपंचायतीकडून स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन हे मुद्दे व्यवस्थीतपणे हाताळण्यात येत आहेत. स्थानिक पंचायतीला या अभियानात ग्रामस्थांचे योगदानही मोठय़ा प्रमाणावर लाभत असून, रांझणी गाव स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावले आहे. ग्रामपंचायतीकडून गावातील चहूबाजूला मोठमोठय़ा कचराकुंडी ठेवण्यात आल्या असून ग्रामस्थांकडून आपापला घनकचरा त्या कचरा डेपोतच टाकण्यात येतो. कुणी कचरा इतरत्र टाकतांना आढळल्यास त्याला ज्येष्ठांकडून तसेच युवकांकडून समजही देण्यात येत असल्याने कचराकुंडींचा योग्य वापर होत आहे. तसेच गावातील बहुतांश ग्रामस्थांकडे वैयक्तिक शौचालये असून, त्यांचा नियमित वापर सुरू आहे तर राहिलेले कुटुंबांचेही शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
गावाची स्वच्छता कायम राहण्यासाठी जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थीही मेहनत घेत असून, मुख्याध्यापक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा तसेच विठ्ठल मंदिर परिसरात नेहमीच स्वच्छता ठेवली जाते. विविध उपक्रम राबविण्यात नेहमी अग्रेसर राहणा:या रांझणी येथील ग्रामस्थांचाही या स्वच्छता अभियान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.