सालदारकी कालबाह्य परंतू दगड उचलण्याची प्रथा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:33 IST2019-05-07T17:32:47+5:302019-05-07T17:33:43+5:30

अशी ही परंपरा : यंदा दोघांनीच केले शक्तीप्रदर्शन

 Salariki is out of date but the tradition of picking stones is permanent | सालदारकी कालबाह्य परंतू दगड उचलण्याची प्रथा कायम

सालदारकी कालबाह्य परंतू दगड उचलण्याची प्रथा कायम

नंदुरबार : खान्देशात अक्षयतृतीयेला शेतीसोबत निगडीत असलेली कामे सुरु करण्याची परंपरा आहे़ यातील बहुतांश परंपरा कालबाह्य झाल्या आहेत़ यात सालदार निवड ही एक अनोखी परंपरा होती़ सालदाराच्या शक्तीपरीक्षणाची अनोखी चाचणी घेत शेतकरी त्याची निवड करुन वर्षभरासाठी करारबद्ध करुन घेत होती़ परंतू सालदारकीच कालबाह्य झाल्याने ही चाचणी आता मनोरंजनाच्या स्वरुपात सुरु आहे़
नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात शेकडो वर्षांपासून अक्षय तृतीयेला दगड उचलून शक्तीप्रदर्शन करण्याची परंपरा आजही सुरु असली तरी त्याकडे सालदार निवडीपेक्षा मनोरंजन म्हणून अधिक पाहिले जात आहे़ मंगळवारी अक्षयतृतीयेनिमित्त कोंडवाडा परिसरात यंदाही दगड उचलून शक्तीप्रदर्शन करण्याची परंपरा जपण्यात आली़ यावेळी केवळ दोघांनीच दगड उचलून शक्तीप्रदर्शन केले़ हे शक्तीप्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित झाले होते़
साधारण २० ते २५ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती होत असताना अक्षयतृतीयेला नंदुरबार शहर आणि परिसरातील शेतकरी येथे उपस्थिती देत होते़ अधिकाधिक वजन उचलून शक्ती प्रदर्शित करणाऱ्या मजूराची सालदार म्हणून शेतकरी निवड करुन त्याला वर्षभराचे धान्य किंवा तत्सम रक्कम देऊन करारबद्ध करुन घेत होते़ अनेक वर्र्षे सुरु असलेली परंपरा गेल्या २० वर्षात पूर्णपणे मोडित निघाली आहे़ बदलेली शेतीपद्धत, विकसित तंत्रज्ञान आणि इतर कामांत मजूरांना मिळणारा अधिक मोबदला यामुळे ‘सालदार’ म्हणून काम करण्याची तयारीच नसल्याने सालदारकीची परंपरा मोडित निघाली आहे़ मंगळवारी सकाळी माळीवाड्यातील कोंडवाडा चौकात माणिक महाजन यांनी ११८ तर अनिल वळवी यांनी १०६ किलोचा दगड उचलून शक्तीप्रदर्शन केले़ दोघांनी प्रत्येकी तीन मिनीटांपर्यंत दगड उचलून ठेवला होता़ अत्यंत शिताफिने दगड आधी हातात तेथून छाती आणि मग खांद्यावर दगड घेत दोघांनी उपस्थितांना खिळवून ठेवले होते़ हा दगड उचलण्याच्या पंरपरेदरम्यान आजवर अनुचित प्रकार किंवा दुखापती झालेली नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली़

Web Title:  Salariki is out of date but the tradition of picking stones is permanent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.