कोरोनाचे विघ्न दूर व्हावे यासाठी बाप्पांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:09 IST2020-08-23T12:09:17+5:302020-08-23T12:09:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचे विघ्न दूर करावे याचे साकडे घालत शनिवारी गणरायांचे घरोघरी उत्साहात आगमन झाले. यंदा ...

Sakda to Bappa to remove the obstacle of Corona | कोरोनाचे विघ्न दूर व्हावे यासाठी बाप्पांना साकडे

कोरोनाचे विघ्न दूर व्हावे यासाठी बाप्पांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचे विघ्न दूर करावे याचे साकडे घालत शनिवारी गणरायांचे घरोघरी उत्साहात आगमन झाले. यंदा मात्र मिरवणुकांचा जल्लोष नाही की कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांचा गजर नाही. त्यामुळे तरुणाईचा हिरमोड दिसून आला. त्याचाच परिणाम म्हणून यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या १०० च्या आतच आहे.
पावसाच्या रिपरिपमध्ये नंदुरबारात बाप्पांचे आगमन झाले. सकाळपासूनच मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये लगबग दिसून येत होती. काहींनी सकाळी मूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी देखील केली. यंदा मूर्तीची संख्या कमी होती. परप्रांतीय मूर्ती विक्रेतेदेखील आलेले नसतांना मूर्र्तींची टंचाई जाणवली नाही. शेवटच्या दिवशी मात्र विक्रेत्यांनी मूर्तीच्या किंमतीत काहीशी वाढ केली होती. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. नागरिकांनी मोठ्या उत्साहात मूर्र्तींची खरेदी केली.
याशिवाय पुजेचे साहित्य, प्रसाद खरेदीसाठी देखील ठिकठिकाणी गर्दी दिसून येत होती. या सर्व माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाल्याचे दिसून आले.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षी ५४३ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी करण्यात आली होती. परंतु या वर्षी कोरोनाची पार्श्वभूमी, उत्सव साजरा करतांना घालण्यात आलेल्या विविध अटी यामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत केवळ ९२ इतकीच नोंदली गेली होती.
उत्सव काळात पाच जणांपेक्षा अधीक जणांनी आरतीला उपस्थित राहू नये. कुणीही मिरवणुका काढू नयेत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह इतर सुचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये यंदा उत्सव साजरा करण्याबाबत निरुत्साह दिसून आला.


अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा केला नाही. उत्सवात खंड पडू नये यासाठी मंडळांनी दीड दिवसांचा उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यासाठी छोटीशी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी दुपारी या मूर्तीचे विधीवत विसर्जन केले जाणार आहे. मंडळ पदाधिकाऱ्याच्या घरात किंवा एखद्या कार्यकर्त्याच्या पोर्चमध्ये बाप्पांची स्थापना करण्यात आली असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.

Web Title: Sakda to Bappa to remove the obstacle of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.