सुसरी धरणाची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST2021-03-04T04:58:58+5:302021-03-04T04:58:58+5:30
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून येणाऱ्या या सुसरी नदीवर पाणी अडविण्यासाठी सुसरी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील हजारो हेक्टर ...

सुसरी धरणाची सुरक्षा वाऱ्यावर
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातून येणाऱ्या या सुसरी नदीवर पाणी अडविण्यासाठी सुसरी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. पाणी अडविण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होतो. या ठिकाणी हौशी नागरिक फिरण्यासाठी तसेच मोबाईलवर सेल्फी काढण्यासाठी धरणावर येतात. नियमाने धरणावर फिरण्यासाठी मनाई आहे. मात्र सुरक्षा रक्षक नसल्याने या ठिकाणी ‘आओ जाओ घर तुम्हारा...’ अशी गत झाली आहे. काही हौशी तरुण या ठिकाणी थेट सुसरी धरणाच्या दरवाजावर चढून मोबाईलद्वारे सेल्फी काढून आनंद घेताना दिसून येतात. या ठिकाणी दुर्घटना जर घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सुसरी धरणानजीक तोरणमाळ या पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्ता आहे. तोरणमाळला जाणारे हौशी तरुण सुसरी धरणाला भेट देत पाणीसाठा पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. तसेच पाणीसाठा पाहताना दुर्घटना घडू शकते. हा विचार करीत संबंधित विभागाने तत्काळ दखल घेऊन धरणाच्या धोक्यात आलेल्या स्थितीत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
सुरक्षा कठडे लावण्याची गरज
सुसरी धरणावर हौशी तरुण सेल्फी काढण्यासाठी येत असतात. या ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्याने अनावधानाने तोल गेल्यावर मोठी दुर्घटनादेखील घडू शकते. यासाठी या ठिकाणी सुरक्षा कठडे लावण्याची गरज आहे.