ग्रामीण भागात जाणाऱ्या एस. टी. सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:20+5:302021-09-02T05:06:20+5:30
नंदुरबार : प्रवाशांच्या प्रतिसादामुळे सध्या एस.टी.चे चाक गतीमान झाले आहे. त्यातून लाॅकडाऊनमुळे खालावलेले उत्पन्न पुन्हा पूर्ववत होत आहे. सध्या ...

ग्रामीण भागात जाणाऱ्या एस. टी. सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार ?
नंदुरबार : प्रवाशांच्या प्रतिसादामुळे सध्या एस.टी.चे चाक गतीमान झाले आहे. त्यातून लाॅकडाऊनमुळे खालावलेले उत्पन्न पुन्हा पूर्ववत होत आहे. सध्या शहरी भागातील बसेस सुरू असल्या तरी ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस मात्र अद्यापही सुरू झालेल्या नसल्याने ग्रामीण प्रवाशांचे हाल होत आहेत. या बसेस सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे.
नंदुरबार आगारातून सध्या दरदिवशी ४७३ बसफेऱ्या सुरू आहेत. या सर्व बसेस लगतच्या गुजरात राज्यासह नाशिक, धुळे, शहादा, तळोदा, अक्कलकुवा तसेच राज्यातील इतर भागांकडे जाणाऱ्या आहेत. त्यात दुपारी सुटणाऱ्या काही ग्रामीण बसेस सुरू असल्या तरी रात्रीच्या मुक्कामी बसेस मात्र बंद आहेत. परिणामी रात्री घरी परतणाऱ्यांचे हाल सुरू आहेत.
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल
नाशिक व धुळे मार्गावर जाणाऱ्या सर्व गाड्यांना गेल्या आठवड्यापासून गर्दी होत आहे. सणासुदीसह देवदर्शन करणारे घराबाहेर पडत आहेत. त्यातून बसेसमध्ये गर्दी होत आहे. कोरोना व लाॅकडाऊनमुळे बाहेरगावी थांबून असलेल्या कामांना तसेच रुग्णालयांमध्ये भेटी देण्यासाठी प्रवासी बसनेच प्रवास करत आहेत.
नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या बहुतांश सर्वच बसेस ह्या प्रवासी क्षमतेने भरल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या काळात धुळे व नाशिक मार्गावर आणखी फेऱ्या वाढविण्याची शक्यता आहे.
तरीही बसफेऱ्या कमी
नंदुरबार आगारातून तालुक्यासह नवापूर, शहादा, तळोदा तालुक्यातील काही गावांच्या फेऱ्या सुुरू आहेत. त्यातून प्रवाशांची ये-जा सुरू असली तरी या फेऱ्या कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
शाळा सुरू झाल्याने नंदुरबार तालुक्याच्या पूर्वभागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी आहे. पालकांकडून होत आहे.
मुक्कामी जाणाऱ्या १० गाड्यांचे काय?
नंदुरबार तालुक्यासह धडगाव, मोलगी, तसेच शहादा तालुक्यातील काही गावांना मुक्कामी बसेस सोडण्यात येत होत्या. या १० बसेस अद्यापही बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे. बसेस सुरू व्हावी यासाठी प्रवाशांकडून पाठपुरावा करून कार्यवाही झालेली नाही.
गाड्या सुरू होणार!
दरम्यान, याबाबत आगारप्रमुख मनोज पवार यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.
आगारात संपर्क केला असता, मुक्कामी बसेस सुरू करण्याची कार्यवाही होणार असून प्रवासीसंख्येच्या आधारे येत्याकाळात सोयीचे मार्ग ठरवून बसेस सुरू होण्याची शक्यता आहे.
बोरद येथे मुक्कामी बस सुरू करण्याची अपेक्षा आहे. याठिकाणी पूर्वी बस येत होती. आता दिवसा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मुक्कामी बस सुरू करणे गरजेचे आहे. गावात इतर आगाराच्या बसेस मुक्कामी राहत आहेत. नंदुरबारनेही बस सुरू करावी.
-योगेश ठाकरे, प्रवासी.
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील शनिमांडळ हे मोठे गाव आहे. याठिकाणी मुक्कामी बस सुरू करण्याची गरज आहे. धुळे व दोंडाईचा आगारातून मुक्कामी बसेस येत आहेत. तीर्थस्थान असल्याने मुक्कामी बस तातडीने सुरू करण्याची अपेक्षा आहे.
-राजेश पाटील, प्रवासी.