कोरोना चाचण्यांबाबत नियमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 13:04 IST2020-08-24T13:04:11+5:302020-08-24T13:04:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाबाहेरून आलेल्या व्यापारी, विक्रेते तसेच इतरांना कोविडची कुठलीही लक्षणे नसल्यास त्यांची कोविड चाचणी होणार ...

कोरोना चाचण्यांबाबत नियमावली
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाबाहेरून आलेल्या व्यापारी, विक्रेते तसेच इतरांना कोविडची कुठलीही लक्षणे नसल्यास त्यांची कोविड चाचणी होणार नाही असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. चाचण्यांची संख्या कमी करणे आणि प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना चाचण्यांची वाढणारी संख्या, त्यामुळे वाढणारा खर्च आणि प्रशासनावरील ताण यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्यांचेही स्वॅब घेण्यात येतात. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढते. परिणामी लक्षणे असलेल्या लोकांच्या चाचणी अहवालांना उशीर होतो ही बाब लक्षात घेता आता एकाच रुग्णाच्या दोन ते तीन चाचण्या होणार नाहीत. ज्या व्यक्तीच्या उपचारासाठी त्वरीत चाचणीची गरज असेल त्यांची अॅण्टीजन चाचणी होईल.
आरटीपीसीआर चाचणी ही ज्यांना लक्षणे आहेत परंतु ज्यांची अॅण्टीजन चाचणी निगेटिव्ह आली अशा लोकांचीच होइल. बाधीत रुग्णाच्या अगदी जवळच्या संपर्कातील व्यक्तीचीही आरटीपीसीआर चाचणी करता येईल. प्रसुतीसाठी आलेल्या महिला, अत्यावश्यक शस्त्रक्रियासाठी येणारे रुग्ण यांची ट्रूनेट चाचणी करण्यात येईल. जेथे ट्रूनेटची सुविधा नसेल तेथे अॅण्टीजन चाचणी करता येईल.
यामुळे नंदुरबारात चाचण्यांची वाढणारी संख्या, अहवालांची वेटींग यावर यामुळे निर्बंध येऊ शकणार आहेत. शासनाचे दोन दिवसांपूर्वी हे आदेश काढले आहेत.