पाच एकर पपई पिकावर फिरवला रोटोव्हीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:58 IST2020-09-13T12:58:49+5:302020-09-13T12:58:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपईच्या लागवडीपूर्वी मशागतीसाठी लाखोंचा खर्च, लागवडीनंतर मशागत, औषध फवारणी आणि खते यावर लाखोंचा खर्च ...

पाच एकर पपई पिकावर फिरवला रोटोव्हीटर
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पपईच्या लागवडीपूर्वी मशागतीसाठी लाखोंचा खर्च, लागवडीनंतर मशागत, औषध फवारणी आणि खते यावर लाखोंचा खर्च असा सुमारे पाच एकर क्षेत्रातील पपईवर सुमारे चार लाख रुपये खर्च करूनही अज्ञात विषाणूमुळे पिकांची वाढ खुंटल्याने विविध उपचार करण्यात आले. मात्र पपईची वाढ होत नसल्याने अखेर पाडळदा येथील युवा शेतकऱ्याने हवालदिल होत औरंगपूर शिवारातील पाच एकर क्षेत्रातील पपई पिकावर रोटाव्हीटर फिरविले.
शहादा तालुक्यातील पाडळदा येथील शेतकरी राकेश पाटील यांनी आपल्या औरंगपूर शिवारातील पाच एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. नियमित खते, रासायनिक औषधी, फवारणी, योग्य ती मशागत करीत होते. आत्तापर्यंत त्यांनी पपई रोपे, लागवड खर्च, मशागत, विविध औषध फवारणी, खते आदी सुमारे चार लाखांपेक्षा अधिक खर्च पपई फळ पिकांवर करण्यात आला होता. परंतु फळ लागण्याआधीच अज्ञात विषाणूने पपईच्या झाडांवर आक्रमण केले. रस्त्यालगतच शेत असल्याने येणारे-जाणारे गृहस्थ, शेतकरी विविध प्रकारचे सल्ले देत होते. त्याप्रमाणे राकेश पाटील हे काहींचे सल्ले मानत पपई पिकावर विविध रासायनिक फवारणीचा उपचार करीत होते. पपईच्या झाडांना काही प्रमाणात फळेही लागली होती. परंतु फळे व झाडांची वाढ होत नव्हती. याबाबत कृषी विभागामार्फत सल्लाही मिळाला नसल्याचे शेतकरी पाटील यांनी सांगितले. उत्पन्नच येणार नसल्याने नाईलाजास्तव पाच एकर क्षेत्रातील पपई बागेवर यांत्रिक नांगर फिरवल्याची माहिती राकेश पाटील यांनी दिली. या नुकसानीची शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.