जिल्ह्यातील २५७ गावांमध्ये ‘रोहयो’तून बेरोजगारांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:17+5:302021-06-10T04:21:17+5:30
नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे हंगामी स्थलांतर पूर्णपणे बंद झाले आहे. यातून एप्रिल महिन्यापासून घरी बसून असलेल्यांना रोजगार हमी योजनेने आधार ...

जिल्ह्यातील २५७ गावांमध्ये ‘रोहयो’तून बेरोजगारांना आधार
नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे हंगामी स्थलांतर पूर्णपणे बंद झाले आहे. यातून एप्रिल महिन्यापासून घरी बसून असलेल्यांना रोजगार हमी योजनेने आधार दिला असून, जिल्ह्यात २७३ ग्रामपंचायतींनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून दिली आहेत.
जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी, वन आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत ‘रोहयो’ची कामे सुरू करण्यात आली आहेत. याअंतर्गत आजअखेरीस २५७ ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार एक हजार ६६६ कामे सुरू असून, आठ हजार १०७ मजूर त्यावर उपस्थित राहत असल्याचा अहवाल समोर आला आहे. सर्व सहा तालुक्यांत सुरू असलेल्या या कामांमुळे मजुरांना रोजगार मिळत असल्याचे समोर आले आहे. यात सामाजिक वनीकरण विभागाकडून जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायतींच्या स्तरावर ५० कामे सुरू आहेत. या ठिकाणी ३५८ मजूर उपस्थित आहेत. वन विभागाकडून ५७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत १०७ कामे सुरू आहेत. या ठिकाणी एक हजार २८८ मजूर कामाला आहेत. कृषी विभागाकडून सध्या ६४ ग्रामपंचायतींअंतर्गत १८२ कामे सुरू असून एक हजार ४४३ मजूर कामाला आहेत.
तळोदा तालुक्यातून स्थलांतर होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तालुक्यात काम नसल्याने प्रशासनाने ‘रोहयो’ची योजना दीर्घकाळ सुरू ठेवण्याची गरज आहे. रोहयोचे वेतन नियमित मिळून कामेही सुरू राहिल्यास स्थलांतराची समस्या कायमची मार्गी लागणार आहे. प्रशासनाने ज्या गावांमध्ये रोहयो नाही, अशा ठिकाणी सर्वेक्षण करावे.
- हिरालाल पावरा, सरपंच
रेवानगर, ता. तळोदा
परिसरातून यंदा कोरोनामुळे स्थलांतर थांबले आहे. शेतीकामांसाठी तसेच विविध कामांसाठी अनेकजण कुटुंबासह परराज्यांत जातात. काही महिने कामे करून परत येतात; परंतु यात त्यांना अडचणी येतात. रोजगार हमी योजनेची कामे शासनानेच दिल्यास मजुरांची अडचण दूर होऊन त्यांना नियमित स्वरूपात वेतन मिळणार आहे.
- सरदार पाडवी, सरपंच
रोझवा पुनर्वसन, ता. तळोदा.
मागणीनुसार कामे
जिल्हा प्रशासनानुसार त्या-त्या ग्रामपंचायतींनी केलेल्या मागणीनुसार कामे दिली जात आहेत. रोजगार हमी योजनेत विभागनिहाय कामकाज सुरू आहे. दीड हजारापेक्षा अधिक कामे सुरू असून नऊ हजारांच्या जवळपास मजूरही कामावर आहेत. योजना चांगल्या प्रकारे सुरू आहे.
- शाहूराज माेरे, उपजिल्हाधिकारी
रोहयो, नंदुरबार
रोहयोतून हाताला काम आहे. यातून अडचणी दूर होत आहेत. परंतु पावसाळ्यात आणि त्यानंतर हे काम राहील का, असा प्रश्न आहे. मस्टर काढणारे व रोजगार सेवकांना सतत माहिती विचारतो. प्रशासनाने पुढची सोय करावी.
- कालूसिंग पाडवी
अक्कलकुवा.
यंदा कोरोनामुळे गावाकडेच आहे. गुजरात राज्यातील ठेकेदार शेतीकामासाठी संपर्क करीत आहेत; परंतु तिकडे दीर्घकाळ मिळेल अशी शक्यता नाही. म्हणून रोजगार हमी योजनेवर काम करून उदरनिर्वाह सुरू आहे.
- करमसिंग वळवी,
तळोदा.