अ‍ॅम्ब्युलन्स सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:34+5:302021-04-18T04:29:34+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) रुग्णवाहिकेची नोंद आहे. परंतु बहुसंख्य रुग्णवाहिका सेवेच्या नावावर व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. अमर्याद कमाईमुळे ...

Robbery of patients in the name of ambulance service | अ‍ॅम्ब्युलन्स सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट

अ‍ॅम्ब्युलन्स सेवेच्या नावाखाली रुग्णांची लूट

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) रुग्णवाहिकेची नोंद आहे. परंतु बहुसंख्य रुग्णवाहिका सेवेच्या नावावर व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे. अमर्याद कमाईमुळे अनेक जण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. सर्वसाधारण चालकापासून, विविध पक्ष, संघटनांचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असणाऱ्या स्पर्धेमुळे या सेवेचे बाजारीकरण होत असल्याचे दिसून येत आहे.

रुग्ण पळविणारी टोळी

शहादा शहराबाहेरून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील गैरसोयीची माहिती देऊन त्यांना भीती दाखवून रुग्णांना खासगी रुग्णालयात पळविण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत. यातून मिळणाऱ्या कमिशनच्या लोभापोटी काही खासगी अ‍ॅम्ब्युलन्स चालक या कामात सक्रिय आहेत. विशेष म्हणजे याची माहिती प्रशासनाला माहिती आहे. परंतु कोणीच काही बोलत नसल्याने त्यांचाही यात समावेश असावा, अशी शंका आहे.

आरटीओने ठरवून दिलेल्या दरपत्रकाला विचारतो कोण?

आरटीओने मारुती, टाटासुमो विंगर व टेम्पो ट्रॅव्हलरसाठी किलोमीटरसाठी दर ठरवून दिले आहेत. परंतु या दरपत्रकाला विचारतो कोण? हा प्रश्न आहे. खासगी रुग्णवाहिका चालक या दराच्या तीनपट दर आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. शासकीय रुग्णालयात अ‍ॅम्ब्युलन्ससाठीचे दरफलक पार्किंगच्या ठिकाणी लावल्यास मृताच्या नातेवाइकांची लूट होण्याचे प्रमाण कमी होईल, असे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.

रुग्णवाहिकेला या मिळतात सवलती

आरोग्य सेवेत अ‍ॅम्ब्युलन्सला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राज्य सरकारने अ‍ॅम्ब्युलन्सला रोड टॅक्समधून सवलत दिली आहे. रुग्णाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहोचता यावे, यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सला निळा दिवा व सायरन वाजविण्याची मुभाही आहे. वाहतुकीच्या सिग्नलवर त्यांना थांबण्याची सक्ती नसते. कुठल्याही प्रकारचा टोल त्यांना लागू नसतो. अशा अनेक सोयी त्यांना दिल्या जातात. मात्र याचा गैरफायदाच घेत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Robbery of patients in the name of ambulance service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.