रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविणार; सप्ताहाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:22+5:302021-01-19T04:33:22+5:30

कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उपप्रादेशिक ...

Road safety will implement various activities during the week; The start of the week | रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविणार; सप्ताहाचा शुभारंभ

रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविणार; सप्ताहाचा शुभारंभ

कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक के.डी. सातपुते, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव उपस्थित होते. डॉ. भारुड म्हणाले, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी कायद्यासोबत नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सवय असणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिस्तपालन करणारी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांविषयी जाणून घ्यावे आणि अपघात कमी करण्यासाठी सहकार्य करावे. सोबतच वेगवान वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पंडित म्हणाले, जिल्ह्यात गतवर्षी १० टक्के अपघात कमी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र, यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या जास्त आहे. अपघात कमी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. असे केल्यास कायद्यानुसार पालकांनादेखील शिक्षा करण्याची तरतूद आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यात आणि अपघात कमी करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गावडे म्हणाले, नियमांचे पालन केल्याने ७० टक्के अपघात टाळता येतात. त्यासाठी जनजागृती उपक्रमात वर्षभर सातत्य ठेवावे. अपघातामुळे होणारे मृत्यू किमान २० टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती घडवून आणावी. वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे वाहतूक नियमांची माहिती दिली. वाहनांची वाढती संख्या, व्यसन घेऊन वाहन चालविणे, युवकांचा अतिउत्साह, वाहनांची दुरुस्ती वेळेत न करणे, खराब हवामान, वाहतुकीचे अयोग्य नियोजन यामुळे अपघात होतात. अपघात टाळण्यासाठी चार ‘ई’ अर्थात कायद्याची अंमलबजावणी, शिक्षण, अभियांत्रिकी आणि तात्काळ आरोग्य सुविधा महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागपूर-सुरत महामार्गावर विसरवाडीजवळ झालेल्या अपघाताच्या वेळी मदतकार्यात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी केले. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Road safety will implement various activities during the week; The start of the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.