शहाद्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 12:26 IST2021-02-06T12:26:02+5:302021-02-06T12:26:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : १७ जानेवारीपासून ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा ...

शहाद्यात रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उडाला फज्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : १७ जानेवारीपासून ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. हे कार्यक्रम फक्त फोटो सेशनसाठी होत असून रस्ता सुरक्षासंदर्भात मात्र प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक वाहनधारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवताना दिसत आहेत. शहरातील बसस्थानक, गांधी पुतळा, स्टेट बँक, मेनरोड आदी चौकांमध्ये अनेक जण वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत.
आरटीओ विभाग व पोलीस प्रशासन यांच्या वतीने सुरू असलेला रस्ता सुरक्षा सप्ताह फक्त उद्घाटनापुरता मर्यादित असल्याचे दिसून येते. शहरातील डोंगरगाव रोडवरील खाजगी वाहतूक करणार्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येत आहेत. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता गाडीच्या मागील बाजूस लटकून प्रवास करताना दिसत आहेत. बसस्थानक परिसरात ही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता मुख्य रस्त्यात उभी केली जातात आणि त्यातून निघणाऱ्या बसेस यामुळे याठिकाणी नेहमीच कोंडी होऊन अपघात होतात. या परिसरात वाहतूक पोलीस असूनदेखील ते बघ्याची भूमिका घेणे पसंत करतात.
शहरात मध्यभागी असलेला गांधी पुतळा परिसर याठिकाणी एकेरी वाहतूक मार्ग असूनही वाहनधारक नियम मोडतात. डायमंड बेकरीजवळ तीन चाकी वाहनांना प्रवेश नसताना दिवसभर मोठ्या वाहनांची वाहतूक या मार्गावर होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव शहरातून सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत अवजड वाहनांना बंदी असूनही दिवसभर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. संबंधित विभागाचे याकडे लक्ष जात नाही.
आरटीओ विभागाने एक दिवस क्रीडा शिक्षकांची बैठक घेऊन कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाचे फोटो सेशन झाले. मात्र संबंधित विभाग येथूनच परत माघारी फिरले. रस्त्यावर कोणत्याही प्रकारे याविषयी जनजागृती होताना दिसत नाही. शासकीय कार्यक्रम म्हणून कार्यक्रम न करता खरंच या सप्ताहाचा उपयोग सामान्य नागरिकांना होईल, अशा उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर रस्त्यावर आरटीओ व पोलीस विभागाच्या वतीने जनजागृती होताना दिसली नाही. त्यामुळे वाहनधारकांना रस्ता सुरक्षा सप्ताहाविषयी माहितीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरा रस्ता सुरक्षा सप्ताह रस्त्यावर साजरा होऊन त्याची माहिती वाहनधारकांना झाल्यास व त्यातून अपघातांचे प्रमाण कमी झाल्यास हे फायद्याचे ठरेल. रस्ता सुरक्षा सप्ताहात पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. असे झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनीही स्वतःसह इतरांचे जीव धोक्यात येणार नाही. यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.
जनजागृतीअभावी नियमांचे उल्लंघन
शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियानात वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व त्याविषयी नियमांची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येतो. मात्र रस्त्यावर वाहनधारकांमध्ये याविषयी जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. यासोबतच खाजगी वाहतूक करणारी वाहने बेशिस्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून नियम पायदळी तुडवत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.