दुसरी पत्नी केल्याच्या रागातून खून करणाऱ्या चौघांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 11:55 IST2019-05-07T11:54:56+5:302019-05-07T11:55:15+5:30
शहादा न्यायालयाचा निकाल : कळमसरे येथील घटना

दुसरी पत्नी केल्याच्या रागातून खून करणाऱ्या चौघांना सश्रम कारावास
नंदुरबार : दुसरी पत्नी केली याचा राग येवून पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत कळमसर, ता.तळोदा येथील पतीचा मृत्यू झाला होता. या घटनेतील चौघा संशयीतांना शहादा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
कळमसर, ता.तळोदा येथे २५ आॅगस्ट २०१६ रोजी ही घटना घडली होती. कळमसर येथील अरुण अन्ना पाडवी याचा पहिला विवाह नळवे येथील सुरेखाबाई यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले देखील झाली. त्यानंतर त्याचे कळमसर येथील एका मुलीशी सूत जुळले. त्यांनी पळून जावून विवाह केला. पहिली पत्नी सुरेखा हीला ही बाब मान्य नव्हती. त्यातून त्यांचे वाद होत होेते. ती माहेरी देखील निघून गेली होती. या वादातून सुरेखाबाई यांचे नातेवाईक किरण पोपट वळवी, शितल पोपट वळवी, मंदा पोपट वळवी व बाप्या शिड्या वळवी यांनी कळमसरे येथे जावून अरुण यास बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. चौघांविरुद्ध तळोदा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपनिरिक्षक युवराज सैंदाणे यांनी शहादा अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्या.पी.बी.नायकवाड यांच्या कोर्टात खटला चालला. सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता किरण वळवी यास दहा वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार दंड व शितल वळवी यांना तीन वर्ष सश्रम कारावास तीन हजार दंड, मंदा वळवी व बाप्या वळवी यांना पाच वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार रवींद्र माळी होते.