Revival of one and a half thousand small scale industries | दीड हजार लघु उद्योगांना संजीवनी

दीड हजार लघु उद्योगांना संजीवनी

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे ३३ टक्के कामगारांसह सुरु असलेल्या लघु आणि मोठ्या उद्योगांना चौथ्या टप्प्यापासून काढण्यात आलेले निर्बंध संजीवनी ठरले आहेत़ बुधवारपासून सुरु होणाऱ्या मिशन बिगिन अगेनमध्ये जिल्ह्यातील दीड हजार लघु आणि मोठे उद्योग हे पुन्हा नव्याने उभे राहणार असून यामुळे उत्पादन आणि रोजगार निर्मितीला पुन्हा वेग येणार आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लघु आणि मोठ्या उद्योगांना मोठा फटका बसला होता़ कच्चा माल आणि मजूर या दोन महत्त्वपूर्ण बाबी नसल्याने उद्योगांची अवस्था बिकट झाली होती़ गेल्या दीड महिन्यात यातून उद्योजक आणि त्यांच्याकडे काम करणारे कारागीर यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली होती़ परंतू नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊनच्या चारच्या शेवटच्या टप्प्यात सुरु झालेल्या बाजारपेठा या उद्योगांना संजीवनी देणाºया ठरल्या आहेत़ यामुळे हळहळू हे उद्योग निर्मिती प्रक्रियेत वेग पकडत आहेत़ परिणामी त्यांच्याकडे काम करणारे मजूर परतू लागल्याने त्यांच्या हातून गेलेले काम पुन्हा परत मिळाले आहे़
विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात नवउद्योजकांना दिशा देणाºया जिल्हा उद्योग केंद्रातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार उन्नती कार्यक्रमात सहभागी होवून बँकाकडे ५० लाख रुपयांपर्यंतचे उद्योग सुरु करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावांवर कामकाज सुरु करण्यात आले आहे़ बहुतांश नवउद्योजकांचे हे प्रस्ताव आहेत़ यातून जिल्ह्यात येत्या काळात किमान ३० कोटी रुपयांची वार्षिक गुंतवणूक होवून लघु उद्योगांना चालना मिळणार आहे़ उद्योगांच्या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली असून प्रामुख्याने शेतीपूरक उद्योगांकडे नवउद्योजकांचा कल असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ राज्यातून लाखोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार परत गेले असल्याने तेथील उद्योग काही प्रमाणात अडखळले आहेत़ परंतू नंदुरबार जिल्ह्यातील लघु उद्योगांमध्ये स्थानिक आदिवासी महिला आणि पुरुषांचे योगदान अधिक आहे़ हे कामगार कामावर परत येऊ लागले आहेत़

जिल्ह्यात ९ मोठे उद्योग आहेत़ तर १ हजार ४४६ लहान अर्थात लघु उद्योग आहेत़ जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या उद्योगांमध्ये आॅईल मिलचा समावेश असून या मिल गेल्या महिनाभरापासून वेगात सुरु झाल्या आहेत़
मिरची प्रक्रिया, मसाले, इंजिनियअरींग, कृषी पूरक उद्योग, दुग्धत्पोदन यासह विविध उद्योगांचा यात समावेश आहे़ लॉकडाऊननंतर नवापुरातील वस्त्रोद्योग, नंदुरबारातील मसाले व मिरची उद्योगावर संकट आले होते़ उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि तयार मालाची होणारी वाहतूक यामुळे या उद्योगांना संकटांचा सामना करावा लागत होता़ लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाने उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल परराज्यातून येण्यास परवानगी दिली़ तसेच मजूरांना कारखान्यापर्यंत जाण्यासाठीच्या अटी व शर्ती शिथिल केल्या, यातून गेल्या महिन्यापासून हे सर्व उद्योग पुन्हा नव्या दमाने सुरु झाले आहेत़ जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार येथील १० कोल्डस्टोरेजही नियमित सुरु झाल्याने मजूरांना रोजगार मिळत आहे़ मजूरांच्या अडीअडचणी लक्षात घेत जिल्हा उद्योग केंद्रांकडून मजूरांच्या कामांचा आढावा घेत उद्योजकांना सूचनाही करण्यात आल्या आहेत़

प्रधानमंत्री रोजगार उन्नती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार उन्नती कार्यक्रमांतर्गत लघु उद्योगांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य हे अनुदानित तत्त्वावर केले जाते़ यातून गेल्या वर्षभरात ४६ नवे उद्योग सुरु झाले आहेत़ जानेवारी व फेब्रुवारी २०२० पर्यंत हे उद्योग उभे राहिले आहेत़ यातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत २३ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे़ यात अनुदानित रक्कमेसोबत उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी स्वत:ही खर्च केल्याने हा आकडा वाढला आहे़ तूर्तास नवीन ५० च्या जवळ लघु उद्योगांचे प्रस्ताव मार्गी लागणे शिल्लक आहे़ हे प्रस्ताव प्रामुख्याने मिरची, मसाले, जिनिंग, प्रेसिंग, कॉटन सीड आॅईल मील, फूड प्रोसेसिंग युनिट, कृषी साहित्य निर्मिती, फळ प्रक्रिया, दुग्धोत्पदन आदी उद्योगांचे आहेत़
एकीकडे उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा असताना नवापुरातील डाळ उद्योगही पूर्ववत मार्गी लागल्याचे चित्र आहे़ वाहतूक व्यवस्था सुरु झाल्याने मालाची निर्यात परराज्यात पूर्ववत झाली आहे़ दुसरीकडे नवापुर तालुक्यातीलच राईस मिल्सही जोमाने सुरु झाल्या आहेत़

शासनाकडून उद्योगांना परवानगी देण्याबाबतचे धोरणे शिथिल करण्यात आली आहेत़ लघु उद्योगांसाठी जिल्ह्यात परवानगी देण्याबाबत कागदपत्रांना फाटा देण्यात आला असून केवळ एका क्लिकवर उद्योग सुरु करता येणार आहे़

शासनाकडून उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे़ नव्या उद्योगांच्या उभारणीसाठी बँकांकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत़ लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत़ मजूर आणि कच्चा माल यांचा पुरवठा सुरु झाला आहे़ यात काही अडचणी आल्यास शासनाकडून उद्योजकांना सूट देण्यात येत आहे़
-उपेंद्र सांगळे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबाऱ

 

Web Title:  Revival of one and a half thousand small scale industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.