रेशन दुकानदाराची हातचलाखी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:13 IST2020-03-14T13:13:06+5:302020-03-14T13:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

रेशन दुकानदाराची हातचलाखी उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आडगाव येथील रेशन दुकानदार मापात पाप करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. कमी धान्य मिळत असल्याने लाभार्थी ग्रामस्थांनी गुरुवारी रेशन धान्य वाटप बंद पाडून तहसीलदारांनी चौकशी करावी, अशी मागणी केली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पुरवठा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आडगाव येथील रेशन दुकानास भेट देऊन चौकशी केली असता रेशन दुकानदार हातचालाखी करीत धान्य वाटप करताना कमी धान्य देत असल्याचे समोर आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आडगाव येथील रेशन दुकानदार पी.एस. रावताळे यांनी गुरुवारी सकाळी धान्य वाटप करण्यासाठी सुरुवात केली. मिळालेल्या धान्याची एका लाभार्थीने घरी पुन्हा मोजणी केली असता प्रत्येक धान्यमागे किमान दोन किलो धान्य कमी आढळून आले. हा प्रकार इतर ग्रामस्थांनाही समजल्यानंतर दुकानात घेऊन गेलेल्या धान्यासह लाभार्थींनी रेशन दुकानाबाहेर गर्दी केली. ज्यांनी धान्य घेतले होते त्याची पुन्हा रेशन दुकानात मोजणी केली असता १० ते २० किलो धान्यात दीड ते दोन किलो धान्य कमी भरले. त्यामुळे ग्रामस्थांनी रेशन दुकानातील वजन-काटा ताब्यात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात जमा केला होता. वरिष्ठ अधिकारी आल्यावर त्यांना हा प्रकार दाखवू असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
‘लोकमत’ने शुक्रवारी हे वृत्त प्रसिद्ध करताच पुरवठा अधिकारी एस.सी. परदेशी, पुरवठा निरीक्षण अधिकारी पंकज खैरनार यांनी आडगाव रेशन दुकानास भेट दिली असता हा काय प्रकार आहे याची चौकशी करण्यात सुरुवात केली. त्यात प्रत्यक्ष वजनकाटा वापरून त्याचे प्रमाण घेण्यात आले. या वेळी प्रत्येक मोजणीमागे एक किलो ३०० ग्रॅम धान्य कमी भरत असल्याचे निर्दशनास आले. हे कमी वजन मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणाºया तगारीचे होते, असे दिसून आले. यावरून वजनकाटा योग्य होता परंतु स्वस्त धान्य दुकानदार हा त्याच्या हातचलाखीने हे मोजमाप करीत असल्याचे दिसून आले. या प्रकाराचा पंचनामा गावातील पाच पंचांसमोर करून अहवाल पुढे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.