भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचा जयनगर येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST2021-07-26T04:27:57+5:302021-07-26T04:27:57+5:30
सत्यप्रकाशगिर गोसावी यांनी भारतीय सैन्य दलात २४ वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, गुजरातसह विविध राज्यात देशसेवा केली आहे. ते याच महिन्यात ...

भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचा जयनगर येथे सत्कार
सत्यप्रकाशगिर गोसावी यांनी भारतीय सैन्य दलात २४ वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, गुजरातसह विविध राज्यात देशसेवा केली आहे. ते याच महिन्यात सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. गावाच्या सुपुत्राने देशाचे रक्षण केल्याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरूण पिढीने घ्यायला हवा, या हेतूने तसेच सेवानिवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या तमाम सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त होईल, म्हणून त्यांचा सन्मान करण्याचे म. फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष इश्वर माळी व ग्रामस्थांनी ठरविले होते. त्यानुसार जयनगर येथील ग्रामपंचायतीत सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या हस्ते व गावातील प्रतिष्ठीत मंडळींच्या हस्ते सेवानिवृत्त सैनिक सत्यप्रकाशगिर गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असतात. मात्र, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते. सत्यप्रकाशगिर गोसावी हे २४ वर्षे देशाची सेवा करून निवृत्त झाले. ही गावकऱ्यांसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे, असे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी म्हटले.
कार्यक्रमाला सरपंच मीनाबाई सोनवणे, उपसरपंच सुनील माळी, म. फुले युवा मंचचे इश्वर माळी, ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन गणेश रामदास माळी यांनी केले.