उरलेली गिधाडेही उपासमारीच्या खाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:04 IST2020-10-10T13:04:01+5:302020-10-10T13:04:16+5:30
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जंगलातील ‘स्वच्छक’ अशी ओळख असलेल्या गिधाडांचे नंदुरबार जिल्ह्याच्या वनक्षेत्रातील अस्तित्त्व जवळजवळ ...

उरलेली गिधाडेही उपासमारीच्या खाईत
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जंगलातील ‘स्वच्छक’ अशी ओळख असलेल्या गिधाडांचे नंदुरबार जिल्ह्याच्या वनक्षेत्रातील अस्तित्त्व जवळजवळ संपुष्टात आले आहे. असे असले तरीही तळोदा तालुक्यात १० गिधाडे तग धरून आहे. परंतु हे वन्यजीव वनविभागाच्या अनास्थेचे बळी ठरणार असून या गिधाडांना उपासमारीच्या खाईत लोटण्याचे श्रेयही वनविभागाला जाणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रालगत अस्तित्त्व टिकवून ठेवणारी गिधाडे २००१ नंतर हळूहळू वनांमध्ये स्थलांतर करत होती. गुरांमध्ये केल्या जाणाऱ्या लसीकरणातील डायक्लोफेनॅक हे रसायन घातक असल्याने त्यांच्या शारिरिक क्षमता खालावून त्यांचा मृत्यू झाला होता. यातून २०१० येईपर्यंत जिल्ह्यातील गिधाडे ही शंभरीच्या आत आली. यातही सातपुडा परिसरात काही ठिकाणी तग धरुन असलेल्या गिधाडांच्या रहिवासाचा अन्नाअभावी पूर्णपणे बिमोड होवून त्यांना स्थलांतर करावे लागले. गिधाडांचे जिल्ह्यात आणि प्रामुख्याने वनक्षेत्रात अस्तित्त्व रहावे यासाठी वनविभागाच्या तळोदा परिक्षेत्रांतर्गत सोजरबार परिसरात गिधाडांसाठी ‘खाणावळ’ सुरू करण्याची घोषणा वनविभागाने २०१४ मध्ये केली होती. यातून काहीतरी चांगले होणार अशी अपेक्षा वन्यजीव प्रेमींना होती. परंतु सहा वर्षे उलटूनही ही खाणावळ सुरू झालेली नाही. गावशिवारात मेलेले जनावर वनक्षेत्रात टाकून गिधाडांचे पोट भरण्याचा हा उपक्रम होता. खूप खर्चिक नसला तरीही वनविभागाने त्याला मान्यता देण्याऐवजी वरिष्ठ पातळीवर पाठवून लाल फितीत ठेवून त्याची पूर्णपणे वासलात लावली आहे. येत्या काळातही हा उपक्रम सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने सोजरबार परिसरात तग धरून असलेल्या गिधाडांच्या समूहालाही स्थलांतर करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या वन्यजीव सप्ताह सुरू असल्याने गिधाडांचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु त्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. सप्ताहाच्या नावाने तळोदा परिसरात पोस्टर्स लावून वन्यजीवांबाबत वनविभाग जनजागृती करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
४तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या अती दुर्गम भागात असलेल्या सोजरबार वनक्षेत्रात १० गिधाडे जिवंत असल्याचा दावा वनविभाग करत आहे. गेल्या पाच वर्षात त्यांची गणना करण्याचा कोणताही उपक्रम विभागाने हाती घेतलेला नाही. विशेष बाब म्हणजे गिधाडे नजरेस पडल्याची कोणतीही माहिती विभागाकडे नाही. दरवेळी केवळ गिधाडांची विष्ठा दिसून येते म्हणून गिधाडे या भागात राहतात. असा दावा वनविभाग करत आहे.
४जिल्ह्यात केवळ तळोदा वनक्षेत्रातच गिधाडांचा रहिवास असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांची काळजी घेण्याबाबत ठोस कार्यक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु २०१४ पासून आजतागायत कोणताही ठोस कार्यक्रम राबवून गिधाडांची निश्चित स्थिती सांगण्यात आलेली नाही.
सोजरबारच्या वनक्षेत्रात गिधाडे आहेत. वनविभागाच्या कर्मचाºयांना त्यांच्या विष्ठा दिसून आल्या होत्या. निश्चित आकडा माहिती नसला तरीही दहाच्या जवळपास या ठिकाणी अस्तित्त्वात असण्याची शक्यता आहे.
-निलेश रोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, तळोदा.