तळोद्यात राममंदिर निधी संकलनास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:57+5:302021-02-05T08:11:57+5:30
श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती गठित करण्यात आली असून तालुका कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. तालुका अभियानाचे अध्यक्ष म्हणून ...

तळोद्यात राममंदिर निधी संकलनास प्रतिसाद
श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती गठित करण्यात आली असून तालुका कार्यालयही सुरू करण्यात आले आहे. तालुका अभियानाचे अध्यक्ष म्हणून डॉ. जगदीश मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकर्ते पुढाकार घेऊन निधी संकलनासाठी शहरासह ग्रामीण भागात फिरत आहेत. तळोदा शहरातील संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रवीण सोनार यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूपुर्वी त्यांनी मुलगा संदीप सोनार यांच्याकडे राममंदिर उभारणीसाठी २१ हजार रुपयांची देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसऱ्या दिवशी सोनार यांच्याकडे कार्यकर्ते द्वारदर्शनासाठी गेलो असता त्यांनी वडिलांच्या इच्छेप्रमाणे २१ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ॲड. संजय पुराणिक व कार्यकर्ते उपस्थित होते. असे भावनिक अनुभवही निधी संकलनदरम्यान कार्यकर्त्यांना येत आहेत.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा श्री साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत वाणी यांनी आपल्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त राम मंदिर उभारणीसाठी ५८ हजार रुपयांच्या निधीची देणगी दिली. श्रीराम मंदिर निधी तळोदा तालुका समर्पण समितीकडे त्यांनी निधीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जिल्हा कार्यवाह ॲड. संजय पुराणिक, तळोदा तालुका समितीचे अध्यक्ष डॉ. जगदीश मगरे, संयोजक राजाराम राणे, जिल्हा प्रचार प्रमुख ॲड. संदीप पवार, जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख किशोर चव्हाण यांनी हा धनादेश स्वीकारला.