Resolve disputes, provide service packages through communication and coordination | विवाद सोडा, संवाद आणि समन्वयातून सेवेचे पॅकेज द्या

विवाद सोडा, संवाद आणि समन्वयातून सेवेचे पॅकेज द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी कोरोनावर उपाययोजनांसाठी बोलविलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला २४ तास उलटत नाही तोच जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात विवादाचे पडसाद उमटत आहे. वास्तविक जिल्ह्यात कधी नव्हे इतकी गंभीर स्थिती सध्या कोरोनाने आणल्यामुळे सर्वांनीच प्राधान्याने रुग्णांना योग्य उपचार, त्यांचे प्रश्न सोडविणे व चांगली सुविधा देणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी मतभेदातील वादापेक्षा संवाद व समन्वयातून सेवेचे चांगले पॅकेज उभे करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाने रोज ८००पेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून येत असून, रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्या मानाने जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यातच रुग्णांसाठी लागणारा ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि सिटीस्कॅन हे मुद्दे चांगलेच गाजत आहे. रुग्णांच्या तक्रारी वाढत असल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी त्यासंदर्भात आपले स्वतंत्र मत मांडले आहे. डाॅ. भारुड यांनी स्वत: एमबीबीएसची पदवी घेतल्याने सिटीस्कॅन कधी करावा, इंजेक्शन कधी घ्यावे याबाबत आपले विचार मांडून ते लोकांचे समुपदेशन करीत आहेत. मात्र त्यांचे हे विचार स्वत: एम. डी. असलेल्या लोकप्रतिनिधी डाॅ. हिना गावित यांना समर्पक वाटत नाही. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या इतरही कामकाजाच्या पद्धतीबाबत त्यांनी नाराजी दर्शविली आहे. ही नाराजी त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी डाॅ. भारुड हेदेखील जिल्ह्यातील सोयी सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. वर्षभरापासून कोरोना, बर्ड फ्ल्यू व इतर प्रश्नांमुळे कामाचा ताणही वाढला आहे. त्यामुळे या ताणाचा कामावर परिणाम असू शकतो. साहजिकच त्यामुळे विवादाची ठिणगी उसळली आहे.

वास्तविक सध्या जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढल्याने लोक खूप बिकट अवस्थेतून जात आहेत. त्यासाठी स्वत: खासदार डाॅ. हिना गावित यांच्यासह इतरही लोकप्रतिनिधी निश्चित गावोगावी फिरून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डाॅ. हिना गावित या स्वत: एम.डी. असल्याने लोकांना आरोग्याचे सल्ले देण्याबरोबरच एक लोकप्रतिनिधी म्हणूनही त्या आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. त्यामुळे जेव्हा कर्तव्य बजावत असताना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे हतबल होण्याची वेळ येते तेव्हा मात्र संताप अनावर होणे हा मानवी स्वभाव आहे. या भावनेतून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात जरी मतभेद होत असले तरी सध्या मृत्युशय्येेवर असलेल्या जिल्हावासीयांच्या सेवेसाठी सर्वांनाच आपल्या भावनांना आवर घालून आहे ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खंबीरपणे प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे वादविवादापेक्षा समन्वय आणि संवादाची दारे खुले करून निकोप चर्चा आवश्यक आहे.

या गोष्टी करता येणे शक्य

१) खासदार डाॅ. हिना गावित यांच्या प्रयत्नाने रेल्वेचा कोविड कोच नंदुरबारला मिळाला आहे. तेथे कुलर व इतर सुविधा उपलब्ध करून सुमारे ३२० ते ४८० रुग्णांसाठी बेडची सुविधा होणार आहे. त्यामुळे सध्याचे एकलव्य सेंटरमधील रुग्णांना तेथे हलवून एकलव्य सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करावे. कारण सध्या जिल्हा रुग्णालयात जेमतेम २०० बेडची सुविधा आहे. म्हणून मध्यम स्वरूपाची लक्षणे व गंभीर रुग्णांसाठी तेथे सुविधा होऊ शकते. आज जिल्ह्यात खासगी रुग्णालयेदेखील रुग्णाचा ऑक्सिजन आणि सिटीस्कॅन स्कोअर विचारूनच बेड देत आहे. ज्या रुग्णाचे ऑक्सिजन कमी व सिटीस्कॅन स्कोअर जास्त असेल त्याला बेड मिळणे कठीण झाले आहे. अशा रुग्णांची सोय एकलव्य सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून देता येणे शक्य आहे.

२) रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी निश्चित प्रचंड वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १५ एप्रिलनंतर बाजारपेठेत या इंजेक्शनची टंचाई दूर होईल. त्यामुळे आज प्रशासनाकडे जे अडीच हजार इंजेक्शनचा साठा आहे त्या इंजेक्शनच्या वापरासाठी एक समिती नेमावी व त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. रुग्णांना योग्य मार्गदर्शनासाठी व उपचारासाठी कुठे सुविधा उपलब्ध आहे त्याची माहिती देण्यासाठी प्रभावी कक्ष सुरू करावा.

Web Title: Resolve disputes, provide service packages through communication and coordination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.