नंदुरबारकरांसाठी आंबेबारा धरणातील जलसाठा आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 15:53 IST2018-11-11T15:53:11+5:302018-11-11T15:53:21+5:30
पालिका सर्वसाधारण सभा : टंचाई दूर करण्यासाठी ठरावाला मंजूरी

नंदुरबारकरांसाठी आंबेबारा धरणातील जलसाठा आरक्षित
नंदुरबार : शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पालिकेने आंबेबारा धरणातील 80 दशलक्ष घनफूट जलसाठा आरक्षणाचा ठराव सर्वसाधारण सभेत केला़ यावेळी शहरातील मुख्य रस्ता व इतर ठिकाणी असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणे काढण्यासह 14 विविध विषयांना मंजूरी देण्यात आली़
पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या़ सोबत व्यासपीठावर पालिका मुख्याधिकारी गणेश गिरी, उपनगराध्यक्ष शोभा मोरे उपस्थित होत़े सभेत नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी पालिका प्रशासनाला 25 मे रोजी विकास कामांबाबत दिलेल्या पत्रावर विचारविनिमय करण्याची मागणी केली असता, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यावर कामे करण्यात येत असल्याची माहिती नगर अभियंता यांनी दिली.
सभेत शहरातील विविध ठिकाणी वाढलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणांना हटवण्याबाबत ठराव करण्यात आला़ बेकायदेशीर बांधकामे सुरू असून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांकडून करण्यात आली़ यावर उत्तर देताना मुख्याधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना येत्या काळात नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली़ दरम्यान पालिकेतील ठेकेदार कामात कसूर करीत असतील अशा ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत भाजपा नगरसेवकांनी रज्जाक पार्कमधील नाला सुधारणा करण्याच्या कामाचे ठेकेदार ठेकेदार पी. एन भावसार यांनी कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला़ या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली़
सभेत नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत साक्री नाका ते तलावपाडा भिलाटी पावेतो रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करणे, रस्ता दुभाजक व गटार बांधकाम, तलावपाडा ते नवापूर चौफुलीपावेतो रस्ता, खडीकरण, डांबरीकरण आणि गटार बांधकाम करण्यासाठी जयसाई कन्स्ट्रक्शन यांनी दिलेल्या पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार निर्णय घेणे, पालिका हद्दीतील सव्रे क्रमांक 396 शेती विभागात समाविष्ट असलेले क्षेत्र वगळून रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत भाजपा नगरसेवकांनी घेतलेल्या हरकतींवर नगराध्यक्षा यांनी सुनावणी घेत दिलेल्या अंतिम निर्णयास मंजूरी देणे या विषयांवरही चर्चा करण्यात आली़