सिंदी दिगर घाटातील रस्त्याची चाैकशी करुन सहा आठवड्यात अहवाल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:47+5:302021-09-08T04:36:47+5:30
नंदुरबार : तोरणमाळ ते सिंदी दिगर रस्त्यावर जुलै महिन्यात झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात रस्त्यांच्या ...

सिंदी दिगर घाटातील रस्त्याची चाैकशी करुन सहा आठवड्यात अहवाल द्या
नंदुरबार : तोरणमाळ ते सिंदी दिगर रस्त्यावर जुलै महिन्यात झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात रस्त्यांच्या अपूर्ण व सदोष कारणामुळे झाल्याची तक्रार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे दाखल झाल्याने आयोगाने या प्रकरणाची दखल घेत सहा आठवड्यात कारवाई करुन अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
तोरणमाळ-सिंदी दिगर घाटात गेल्या १८ जुलै रोजी घाटात २०० फूट खाेल दरीत जीप कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात रस्त्याच्या सदोष व अपूर्ण कामामुळे झाल्याची तक्रार करण्यात आली होती. येथील सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत यांनी देखील राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करुन रस्त्यांच्या सदोष कामामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत त्यातून आठ जणांना जीव गमवावा लागला होता. आदिवासींच्या हक्कालाही बाधा असून याप्रकरणाची उच्चस्तरीय चाैकशीची मागणी केली होती. त्यावर मानवी हक्क आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत चाैकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच सहा आठवड्याच्या आत या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सदोष व निकृष्ट रस्ते हे अपघाताचे कारण ठरत आहेत. सिंदीदिगर घाटातील अपघातही रस्त्याच्या सदोष आणि निकृष्ट कामामुळे झाला असून त्या संदर्भात आपण तक्रार केली होती. मानवी हक्क आयोगाने त्याची दखल घेतली याचे समाधान असून जिल्हा प्रशासनाने आता तात्काळ कारवाई करावी हीच अपेक्षा आहे.
-दिग्विजय राजपूत,
तक्रारदार कार्यकर्ता,