खरीप पेरणीसाठी शेती अवजारांची दुरुस्ती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:32+5:302021-06-02T04:23:32+5:30
वर्षभर एका ठिकाणी असल्यामुळे काही अवजारांची मोडतोड होते. सध्या त्या अवजारांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सुतार व ...

खरीप पेरणीसाठी शेती अवजारांची दुरुस्ती सुरू
वर्षभर एका ठिकाणी असल्यामुळे काही अवजारांची मोडतोड होते. सध्या त्या अवजारांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सुतार व लोहार काम करणाऱ्या कारागिरांकडून प्रामुख्याने ही अवजारे दुरुस्त केली जातात. त्या बदल्यात त्यांना धान्य अथवा पैसे दिले जातात.
खांडबारा परिसरात धूळवाफेवरील पेरणीला प्राधान्य दिले जाते. यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, मका आदी पिके घेतली जातात. सध्या या भागात पेरणीची धांदल सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण शिवार माणसांनी गजबजलेले दिसून येत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळ-वाऱ्याच्या प्रभावामुळे या परिसरात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला सुरुवात केली आहे.
ढेकळं पावसाने फुटली
उन्हाळी नांगरटीमुळे निघालेली मोठमोठी ढेकळं पावसाने विरघळून गेली आहेत. त्यामुळे सर्वजण शेतीच्या कामात गुंतले आहेत. बांधावची जुळवाजुळव करणे, शेतीतील सड, पालापाचोळा काढून रान स्वच्छ करणे, खत विस्कटणे आदी कामे महिला-पुररष करत आहेत. शेतकऱ्यांकडून शेतीची अवजारे दुरुस्त करून घेण्याची धांदल सुरू आहे. नांगर, फाळ, इडी, कासरे, कुळव, पास, जानावळे, चारफणी, सहाफणी, त्याला लागणारे नळ, चाडे आदी साहित्यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी गुंतले आहेत.