अतिदुर्गम भागात आमदारांनी पायपीट करीत समस्या जाणून घेतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:27 IST2020-12-18T11:27:11+5:302020-12-18T11:27:29+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागझिरी, उमरापाणी, कोटबांधणी या गावांना  भेट देत आमदार राजेश पाडवी यांनी ...

In remote areas, MLAs learned about the problems by piping | अतिदुर्गम भागात आमदारांनी पायपीट करीत समस्या जाणून घेतल्या

अतिदुर्गम भागात आमदारांनी पायपीट करीत समस्या जाणून घेतल्या

 लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागझिरी, उमरापाणी, कोटबांधणी या गावांना  भेट देत आमदार राजेश पाडवी यांनी तेथील गावकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आगामी काही महिन्यात या सर्व गावांना रस्ते व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. 
          सातपुडा पर्वतरांगेत अनेक गाव-पाडे अतिदुर्गम भागात मोडतात. गेल्या   अनेक वर्षांपासून येथील गावकरी    प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र निवडणूक संपली की उमेदवारांनी दिलेले आश्वासन हवेत अदृश्य होतात हा येथील गावकऱ्यांचा नेहमीचा अनुभव आहे. 
आमदार राजेश पाडवी यांनी मतदारसंघात संपर्क अभियान राबविले असून प्रत्येक आठवड्यात अतिदुर्गम भागातील गावांना भेट देऊन तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम सुरू आहे.  आमदार पाडवी यांनी सांगितले की, प्रत्येक पाड्यापर्यंत रस्ते तयार करण्यात येतील, वीजपुरवठाही लवकर आपल्यापर्यंत पोहोचवू व पिण्याच्या पाण्यासाठी नवीन विहिरी बनवून   देण्यात येतील. रेशनकार्ड, शासनाच्या विविध लाभाच्या योजनांतर्गत विधवा महिलांना पगार, घरकूल, वृध्दांचा     पगार यासाठी कोणालाही अडचणी    येत असतील तर माझ्याशी संपर्क साधावा. वनपट्ट्यांचा प्रश्नही मार्गी लावणार असून प्रलंबित असलेले दावे लवकरच निकाली काढू, असे सांगितले. 
                  या वेळी काँग्रेस पक्षात २० वर्षापासून काम करणारे पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर पावरा व उपलापाणीचे कारभारी नोबल्या वळवी यांच्यासह कार्यकर्ते व महिलांनी भाजपमधे प्रवेश केला.  या वेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुनील चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, अदिवासी मोर्चाचे जिल्हा सचिव नारायण ठाकरे, पंचायत समिती सदस्य डॉ.विजय चौधरी, अदिवासी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुखलाल रावताळे, माजी सरपंच शंकर पावरा, कारभारी नोबल्या वळवी, कोटबांधणीचे जगन मोरे, वीरसिंग पाडवी, गुड्डू वळवी, गोपी पावरा, बाबूलाल पावरा, कांतीलाल पाडवी, गुलाबसिंग भिल, आट्या भिल, दाज्या भिल, रतिलाल भिल,   कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमच्या भेटीला आलेले पहिले आमदार...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीने आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन आमच्या समस्यांबाबत चर्चा केली नव्हती. आमदार राजेश पाडवी यांनी प्रत्येक पाड्यावर पायपीट करून गावकऱ्यांच्या  घरी जाऊन चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या. आम्ही प्रत्येक निवडणुकीत आमच्या मतदानाचा हक्क बजावतो. मात्र आजपर्यंत निवडून गेलेले लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, जि.प. सदस्य आमच्या भेटीला आले नाही. आपण पहिले आमदार आहात की जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडल्यानंतर आमच्या घरापर्यंत पोहोचले, अशा शब्दात गावकर्‍यांनी आमदार पाडवी यांच्याजवळ भावना या वेळी व्यक्त केल्या.

Web Title: In remote areas, MLAs learned about the problems by piping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.