धर्म म्हणजे कर्तव्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 20:37 IST2019-03-31T20:37:08+5:302019-03-31T20:37:13+5:30
धर्म म्हणजे कर्तव्य ! आपल्या जीवनात आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म सांभाळणे अशी साधी व सोपी धर्माची व्याख्या ...

धर्म म्हणजे कर्तव्य !
धर्म म्हणजे कर्तव्य ! आपल्या जीवनात आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म सांभाळणे अशी साधी व सोपी धर्माची व्याख्या भागवतकार रमेश गणेश शास्त्री उर्फ बापू शास्त्री सांगतात.
भागवतकार बापू शास्त्री यांनी आतापर्यंत ३५८ भागवत पारायणे पूर्ण केली केली आहेत. बापू शास्त्री बी.ए.बी.एड. असून ३० वर्षे त्यांनी शहादा तालुका को-आॅपरेटीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शेठ व्ही.के. शाह विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे. १९९६ साली ते सेवानिवृत्त झाले. बापू शास्त्री यांचे वडील भागवतकार असल्याने तसेच घरी भागवतकार, प्रवचनकार यांचा सतत संपर्क असल्याने लहानपणापासूनच पोथी वाचण्याची आवड निर्माण झाली. घरात धार्मिक वातावरण, संभाषण संस्कृतमधूनच होत असल्याने बापू भागवत कथेकडे वळले. मंदिरातच राहत असल्याने वडिलांच्या अनुपस्थितीत चातुर्मासात बापू भागवत कथा सांगत. अगदी लहानपणापासूनच बापू भागवत करत असल्याने भागवत कथेवर त्यांची पकड बसल्याने डोंबिवली, पुणे, मालेगाव, कल्याण या महाराष्ट्रातील शहरांबरोबरच उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आदी ठिकाणी त्यांचे भागवत झाले आहेत. १९६८ पासून ते आतापर्यंत त्यांनी ३५८ भागवत कथा भागवत केल्या असून भागवत कथा सांगायची एकसष्टी त्यांनी पूर्ण केली आहे. अनेकदा भागवताचे उत्पन्न ते समाजासाठी अर्पण करत असतात. मातोश्री वृद्धाश्रम, वनवासी कल्याण आश्रम यांच्यासाठी त्यांनी भागवत कथा केल्या आहेत. त्याचप्रमाणे बालाजी मंदिर शहादा व दत्त मंदिर तळेगाव यांच्या उभारणीसाठीदेखील त्यांनी भागवत केले आहे. बापूंच्या १३ पिढ्यांपासून भागवत कथा सांगण्याची परंपरा सुरू आहे. धर्म म्हणजे माणसाच्या जीवनातील कर्तव्य अशी साधी, सोपी व सरळ व्याख्या ते करतात. प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्ण करणे म्हणजे धर्म होय. पुत्रधर्म, शेजारधर्म, पतीधर्म हा खरा धर्म. समाज व देशाप्रती असलेले कर्तव्य म्हणजे धर्म असे ते सांगतात. पूजापाठ ही उपासना पद्धत आहे, देवाच्या जवळ जाण्याचा तो एक मार्ग आहे. कर्तव्य पार पाडणे हीच खरी धर्माची शिकवण असल्याने या धर्माचे पालन महत्त्वाचे असल्याचे बापू शास्त्री आवर्जून सांगतात. भागवत केल्याने आपल्याला आनंद मिळतो, समाज प्रबोधन करता येते आणि म्हणून वयाची ८१ वर्षे होऊनही बापूंचे भागवत कथा प्रवचन सुरू आहेत. बापू अतिशय सोप्या भाषेत व शब्दात भागवत कथा सांगत असल्याने बापूंचे भागवत कथा ऐकण्यात भाविक रमून जातात.
-सुनील सोमवंशी, शहादा