भाजीपाला आवक वाढल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:14+5:302021-06-10T04:21:14+5:30
गतिरोधक टाकण्याची मागणी धरतेय जोर नंदुरबार : करण चाैफुली ते होळ फाटा उड्डाणपूल या मार्गावर संत सेना चाैक (गुरुकुल ...

भाजीपाला आवक वाढल्याने दिलासा
गतिरोधक टाकण्याची मागणी धरतेय जोर
नंदुरबार : करण चाैफुली ते होळ फाटा उड्डाणपूल या मार्गावर संत सेना चाैक (गुरुकुल चाैफुली) या भागात दोन ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज आहे. मार्गाच्या दुतर्फा वसाहती, दवाखाने, मसाले विक्रीची दुकाने व गॅरेजेस आहेत. यातून या मार्गावर वर्दळ वाढून अपघातांची भीती आहे.
तळोदा रोडवर सुशोभीकरण
नंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग महामार्गावर सीबी पेट्रोलियम ते जोगेश्वरी माता मंदिर या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बांधकाम विभागाने पांढरे पट्टे, स्वयंचलित कॅटाईज तसेच झेब्रा क्राॅसिंग तयार केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावर दोन ठिकाणी गतिरोधक टाकण्याचीही नागरिकांची मागणी आहे.
सॅनिटायझरच्या विक्रीत पुन्हा झाली वाढ
नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत सॅनिटायझर विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खासकरून प्रवासात वापर होणाऱ्या छोट्या बाटल्या तसेच स्प्रे बाॅटल्सला मोठी मागणी आहे. सर्व व्यवहार खुले झाल्याने सुरक्षाउपाय म्हणून सॅनिटायझर्सचा वापर होत आहे.
वाचनालये फुलली
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात वाचनालयेही दोन महिन्यांनंतर सुरू झाली आहेत. शासन नियमानुसार वाचनालय प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. याठिकाणी तूर्तास गर्दी कमी असून, लवकरच स्पर्धा परीक्षांसाठीच्या अभ्यासिका सुरू होतील, अशी शक्यता आहे.
लसीकरणासाठी अनेकांची होतेय फरफट
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. यातून नागरिक विभागले जात आहेत. याचा सर्वाधिक फटका शहरी भागातील नागरिकांना बसत आहे. डोस वाया जाऊ नयेत यासाठी दहाची संख्या होईपर्यंत अनेकांना सक्तीने बसवून ठेवले जात आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन सुसूत्रता आणण्याची आवश्यकता आहे.
मसाला विक्रेतेही होऊ लागले दाखल
नंदुरबार : शहरात मंगळवारी झालेल्या आठवडे बाजारात कैरीची आवक झाली होती. हा बाजार सुरू असताना याठिकाणी मसाले विक्रेतेही दाखल झाले होते. लाॅकडाऊन संपल्याने शहरात आलेल्या या विक्रेत्यांकडून मसाल्यांची मोठी खरेदी केली जाते.
ग्रामीण भागात फेऱ्या वाढवण्याची मागणी
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद व मोड भागातील गावांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी अक्कलकुवा, नंदुरबार व शहादा आगाराच्या बसेसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. दोन महिन्यांपासून बसेस बंद असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्यांचे हाल होत आहेत.
बेशिस्तांची पळापळ
नंदुरबार : पोलीस दलाकडून मास्कचा वापर न करण्यासह थुंकणारे व दुचाकीवर बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. यातून पोलीस पथक दिसून आल्यानंतर बेशिस्तांची पळापळ होत असल्याचे चित्र आहे. यात युवकांची संख्या मोठी असल्याची माहिती समाेर आली आहे.
शेतकामांना गती
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्वभागात कापूस लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता असल्याने शेतकामांना गती आली आहे. यंदा पाऊस चांगला असल्याच्या अंदाजाने शेतकरी वाढीव क्षेत्रात कापूस व इतर पीक लागवडीच्या तयारीत आहेत.