The relief of the fifth lockdown | पाचव्या लॉकडाऊनचा दिलासा

पाचव्या लॉकडाऊनचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाचव्या लॉकडाऊनच्या निर्देशानुसार केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच लॉकडाऊनची अंमलबजावणी राहणार आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत होणार आहेत. जिल्ह्यात शहरी भागाचा विचार करता सद्य स्थितीत केवळ नंदुरबार व शहादा शहरातच प्रत्येकी एका भागात प्रतिबंधीत क्षेत्र आहे. तर रजाळे, हिंगणी गावात प्रतिबंधीत क्षेत्र आहे. त्यामुळे पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील अर्थचक्र गतीमान होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्हा पूर्वीपासून आॅरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनपासून जिल्ह्यातील काही व्यवसाय सुरळीत सुरू झाले. यामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक यांच्यादृष्टीने ते दिलासादायक ठरले. आता पाचव्या लॉकडाऊनमध्ये शासनाने बरेच निर्बंध उठविल्याने व्यवहाराचा गाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग देखील मर्यादीत व स्थिर आहे. त्यामुळे जिल्हा पूर्वी ग्रीन झोनमध्ये होता त्यानंतर तो आॅरेंज झोनमध्ये आला. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनच्या अनेक नियमांमधून जिल्ह्याची सुटका झाली होती. त्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवणे, जिल्हाअंतर्गत एस.टी.वाहतूक, कृषी मालाची वाहतूक व विक्री यासह इतर सवलतींचा समावेश होता. रुग्ण संख्या स्थिर राहिल्याने पाचव्या लॉकडाऊनच्या नियमांचा फायदा आता आणखी जास्त स्वरूपात जिल्ह्याला मिळणार आहे.
दोन शहर आणि दोन गावात प्रतिबंधीत क्षेत्र
सद्य स्थितीत नंदुरबारातील भोई गल्लीचा परिसर आणि शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील परिसर वगळता इतर क्षेत्रात प्रतिबंधीत क्षेत्र नाही. ग्रामिण भागात रजाळे, ता.नंदुरबार आणि हिंगणी, ता.शहादा येथे प्रतिबंधीत क्षेत्र आहे. पाचव्या लॉकडाऊनमध्ये केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच नियम लागू राहणार असल्यामुळे इतर भागातील व्यावसायिक, उद्योजक यांना दिलासा मिळाला आहे. आता राज्य शासनाच्या आदेशात काय आणि कसे नियम घालून दिले जातात त्याकडे लक्ष लागून आहे.
संचारबंदी केवळ रात्रीच
आतापर्यंत संचारबंदीची वेळ ही सायंकाळी सात ते सकाळी सात अशी होती. पाचव्या लॉकडाऊनमध्ये संचारबंदीची वेळ ही रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोलपंपासह इतर व्यावसायिकांना रात्री नऊ वाजेपर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत.
मात्र शाळा, महाविद्यालये, लग्न समारंभ, सार्वजनिक समारंभ यांच्यावर बंदी कायम राहणार असून उपस्थितांच्या संख्येची मर्यादा राहणार आहे.


पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाअंतर्गतसह जिल्हाबाहेरील वाहतुकीला व प्रवासाला मुबा राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे आता आंतरजिल्हा एस.टी.सेवा सुरू होईल का याकडे लक्ष आहे.


केंद्र शासनाने पाचवा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य शासनाकडून अद्याप त्यावर मार्गदर्शक सुचना बाकी आहेत. त्या येताच जिल्हा संदर्भातही निर्णय घेतला जाणार आहे.
-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.


पाचव्या लॉकडाऊनमध्ये अनेक बांबींची शिथीलता मिळणार आहे. यामुळे व्यवहार आणि उद्योगाची गती आणि चक्रे वेगवान होणार आहेत. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होऊन बेरोजगार हातांना काम मिळणार आहे.आता राज्य शासनाच्या निर्देशांकडे लक्ष लागून आहे.
-मनोज रघुवंशी, उद्योजक, नंदुरबार.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून व्यवसाय, उद्योग ठप्प आहेत. आता खरीपाच्या हंगामत तरी लॉकडाऊनमधून सूट मिळावी व अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर यावा अशी अपेक्षा होती. पाचव्या लॉकडाऊनमधून बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असा नाही, त्यामुळे काळजी घ्यावीच लागेल.
-ललीतकुमार रमणलाल छाजेड, व्यावसायीक, शहादा.

Web Title: The relief of the fifth lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.