राम नामाच्या जयघोषात आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:29 IST2020-08-06T12:29:00+5:302020-08-06T12:29:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राम मंदीर बांधकाम भुमिपूजनाचा आनंदोत्सव जिल्हाभरात साजरा करण्यात आला. ठिकाणच्या श्रीराम मंदीरांसह इतर मंदीरांवर ...

राम नामाच्या जयघोषात आनंदोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राम मंदीर बांधकाम भुमिपूजनाचा आनंदोत्सव जिल्हाभरात साजरा करण्यात आला. ठिकाणच्या श्रीराम मंदीरांसह इतर मंदीरांवर विद्युत रोषणाई करून रांगोळीसह परिसर सजविण्याला आला होता. अनेक कुटूंबांनी आपल्या घराच्या परिसरात गुढी उभारून, रांगोळी काढून उत्सव साजरा केला. भाजप जिल्हा व तालुका कार्यालयांमध्ये उत्सवाचे वातावरण होते. दरम्यान, जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह जिल्हाबाहेरील ४०० होमगार्ड तैणात करण्यात आले होते.
आयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दुपारी राम मंदीराचे भुमिपूजन करण्यात आले. आज होणाऱ्या या कार्यक्रमानिमित्त गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या निमित्ताने बुधवारी अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उत्सव साजरा करतांना त्यात अतिउत्साहीपणा येऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. संवेदनशील ठिकाणी वाढीव बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
रोषणाई, रांगोळीने मंदीरे सजली
जिल्हाभरातील राम मंदीरांवर तसेच इतर सर्वच मोठ्या मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासूनच मंदीरांचा परिसर रांगोळींनी सजविण्यात आला होता. ठिकठिकाणी मिठाई वाटप करण्यात येत होती. गर्दी होणार नाही याचे भान ठेवत हे सर्व कार्यक्रम सुरू होते. भाजप, विश्व हिंदू परिषद तसेच इतर संघटनांतर्फे उपक्रम झाले.
घरांचे अंगणही सजले
अनेक कुटूंबांनी या निमित्ताने घरासमोर रांगोळी काढून, भगवा पतका लावून तर काहींनी गुढी उभारून उत्सवात सहभाग घेतला. सकाळपासूनच घराघरात टिव्हीवरील थेट प्रेक्षेपण पाहिले जात होते. दुपारी दोन वाजेपर्यंत हे वातावरण कायम होेते.
भाजप कार्यालयात उत्साह
नंदुरबारातील भाजपच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण होते. कार्यालयाबाहेर राम मंदीराची मोठी रांगोळी काढण्यात आली होती. कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी झाली होती. छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता.
राज्य राखीवची तुकडी
जिल्ह्यात या निमित्ताने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह स्थानिक होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, तसेच जिल्हाबाहेरील ४०० होमगार्ड तैणात करण्यात आले होते. मुख्य चौक आणि संवदेनशील ठिकाणी तसेच राम मंदीरे आणि इतर मोठ्या मंदीरांवर हा बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त तैणात होता.
तळोद्यातील सत्कार रद्द
तळोद्यात कारसेवकांचा सत्काराचे भाजपतर्फे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांनी नियोजन केले होते. परंतु कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी सुचना केल्याने तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला होता.
खेतियात सामुहिक आरती व रामनाम जप
खेतिया : खेतिया येथील राम मंदिरात विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळपासून मंदिरात भविकांनी दर्शन घेत होते.
राम नामचा जप, सुंदरकांड व हनुमान चालीसा पाठ खेतिया येथील सुंदरकांड मित्र मंडळ व नागरिकांनी केले. त्यानंतर आरती करण्यात आली यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन ही करण्यात आल. पुजारी तरुण शुक्ला आणि प्रतीक शुक्ला यांनी पूजा केली. यावेळी मंदिर परिसरात पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खेतिया येथे ठिकठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करून मिठाई वाटप करून तसेच एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त करण्यात आला.
प्रत्येक नागरिक जय श्री राम, जय सियाराम चा जयघोषने शहर दुमदुमले होते. तसेच शहरात ठिकठिकाणी चौकात भगवे पताके, झेंडे लावले होते आणि संपूर्ण शहर हे भगवामय झाले होते.
शहादा परिसर झाला भगवामय
शहादा : शहरात दोन दिवसापासून कमालीचे उत्साहाचे वातावरण असून राष्ट्रीय स्वयं संघ व विश्व हिंदू परिषद तर्फे नागरिकांना आनंद साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व प्रमुख मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काल दिनांक चार आॅगस्ट रोजी रात्रीपासून चावडी चौकातील पुरातन राम मंदिराला विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख मंदिरांना सजावट करण्यात आलेली आहे ठीक ठिकाणी भगवे झेंडे लावून असंख्य भक्तांनी आपल्या घरावर विद्युत रोषणाई केली. सकाळी नऊ वाजता पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पायी गस्त घातली. तर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील शहादा येथे भेट देऊन अधिकाºयांना सूचना केल्या. प्रत्येक रामभक्त शहरातील नागरिक रस्त्यावर एकमेकांना भेटताना जय श्रीराम म्हणत होते जल्लोषाचे वातावरण सकाळपासून होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर आनंद साजरा करताना दिसत होते मात्र सर्वजण शासनाचे नियमाचे पालन करत होते.
लोणखेडा तालुका शहादा येथे ज्येष्ठ रामभक्त अयोध्या येथे जाणारे पहिले कारसेवक अशोक दशरथ पाटील यांनी विद्युत रोषणाई करून दिव्यांनी सजवलेले होते. गावात लांबूनच आकर्षक विद्युत रोषणाई नजरेस पडत होती. राम मंदिराचे भूमिपूजन म्हणजे श्रीराम भक्तांचा जल्लोषाच्या दिवस आहे. एकमेकांना मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकांना श्री प्रभू रामचंद्र यांचा आशीर्वाद मिळणार आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा यांनी व्यक्त केली.