‘कलाशक्ती’तून फोडली प्रश्नांना वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 12:37 PM2020-01-19T12:37:53+5:302020-01-19T12:38:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एकट्या महिलेवर अत्याचार करणारी माणसंं असतात का, देशात हिंस्त्र पशुंसारखे मारहाण करुन मॉब लिंचिंग ...

Read the questions thrown at 'art power' | ‘कलाशक्ती’तून फोडली प्रश्नांना वाचा

‘कलाशक्ती’तून फोडली प्रश्नांना वाचा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : एकट्या महिलेवर अत्याचार करणारी माणसंं असतात का, देशात हिंस्त्र पशुंसारखे मारहाण करुन मॉब लिंचिंग करतात तेव्हा तुम्ही माणसं असतात का, बेरोजगारी आहे परंतू इतरच मुद्द्यांना महत्त्व दिले जाते ही मानवता आहे का, आणि सोशल मिडिया म्हणजे मक्तेदारी आहे का, असे नानाविध प्रश्न विचारणारी तरुणाई आज प्रत्येक रंगमंचावर अवतरली होती़ सामाजिक प्रश्नांवर थेट आसूड ओढून परीक्षकांसह प्रेक्षकांनाही अंतर्मुख करणाऱ्या या प्रश्नांनी वातावरण ढवळून निघाले़
कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या युवारंग युवक महोत्सवाचा तिसरा दिवस तरुणाईच्या सळसळत्या जागरुकतेने गाजवला़ मनाचा ठाव घेणाºया तसेच तरुणाईच्या अंगी असलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाºया युवारंग महोत्सवाचा आजचा दिवस लक्षवेधी ठरला.
आजअखेरीस चर्चेत असलेल्या राजकीय विषयांवर विडंबनातून प्रहार करत तरुणांनी राजकीय पक्षांच्या सोयीनुसार बदलत्या भूमिकांवर आगपाखड केली. तर स्त्री भ्रूणहत्या, महिला सुरक्षा, बेरोजगारी अशा सामाजिक विषयांवर दमदार सादरीकरण करत प्रकाशझोत टाकला. त्याचबरोबर सुगम गायन, समुह गीतांनी उपस्थित रसिकांसह निरिक्षकही मंत्रमुग्ध झाले होते़ तर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्पॉट पेंटींगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते़

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील बहुरंगी कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरु असलेल्या युवारंगाच्या तिसºया दिवशी कलेच्या विविध रंगांची मनोसोक्त उधळण पहावयास मिळाली़ कलाविष्कार व्यासपीठांवरच नव्हे तर रंगीत तालीमीतूनही दिसून आली़ कला सादरीकरणापूर्वी लागणारी हुरहुर आणि कला सादर झाल्यानंतर केला जाणारा जल्लोष यातून तरुणाई स्वत:च्या भावना मोकळ्या करत होती़
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील एकूण १२१ महाविद्यालयाच्या २ हजार २०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने नटलेल्या युवारंग युवक महोत्सवाच्या तिसºया दिवशी सळसळत्या तरुणाईचा जल्लोष हा सर्वच ठिकाणी पहावयास मिळाला़ दरम्यान एकीकडे विडबन आणि मूकनाट्यातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जात असताना दुसरीकडे सुगम गायन व समूह गीतांचे सादरीकरण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होते़ श्रवणीय अशी ही गीते गुणगुणतांना अनेकजण दिसून आले़ तर दुसरीकडे ठेका धरायला लावणाºया गीतांवर अनेक मनसोक्त नृत्य करुन जल्लोष केला़

मूकनाट्यातून हैदराबादची
घटना पुन्हा झाली जिवंत

शहादा : देशात वाढणारे स्त्रियांवरील अत्याचार व त्यामुळे निर्माण होणारा महिला सुरक्षेचा प्रश्न घेऊन आजच्या संवेदनशील तरुणाईने युवारंगात सादर केलेल्या मूकनाट्यातून उपस्थितांच्या डोळयात अंजन घातले़ दरम्यान, हैदराबाद येथे झालेल्या महिला डॉक्टरवरील बलात्काराच्या प्रसंगाचे चित्र उभे करून अवघ्या रंगमंचावर उपस्थित असलेल्या विदयार्थी, प्राध्यापकाचा थरकाप उडाला. थोड्यावेळाने याच मंचावर सर्जिकल स्ट्राईकचा थरार आणि भारतीय सैनिकांचे शौर्यही मूकाभिनयाद्वारे उभारण्यात आला़
आनंदयात्री पु़ल़ देशपाडे रंगमंच क्रमांक एकवर दुपारी २ वाजता मूकनाट्य स्पर्धा झाली़ विडंबन नाट्य स्पर्धेतील काही स्पर्धकांचे शनिवारी सादरीकरण झाल्यामुळे अडीच तास उशिराने मूकनाट्य स्पर्धा सुरु झाली़ यावेळी विद्यार्थ्यांनी मूकनाट्यातून विविध विषयांना हात घातला. त्यात सर्वात प्रखर विषय होता युवती आणि महिलांवरील अत्याचारांचा़ महिलांवरील अत्याचारांना मांडताना शब्दांचाही कंठ दाटून यावा अशी स्थिती असताना मूकनाट्याद्वारे कलाकारांनी हा विषय अतिशय ताकदीने व प्रभावीपणे सादर केला. पर्यावरण संवर्धन आणि मानवी जीवन कसे असे असते हे पाहण्यासाठी प्राणी जेव्हा जंगलातून शहरात येतो तो प्रत्येक घटनाक्रम अतिशय गंमतीशीर पध्दतीने रंगमंचावर आणला.
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव, दोन जवानांच्या शिरच्छेदानंतर नागरिकांमधील संतापाची भावना यांनाही रंगमंचावर सादर करण्यात आले. ‘अ ट्रिब्युट टू आर्मी’ या मूकनाट्यातून एका संघाच्या विद्यार्थ्यांनी आर्मी जवानांच्या शौयार्ला सलाम केला. या मूकनाट्यातील अखेरचे दृश्य मन हेलावणारे होते़ त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी सांगितलेला अंहिसेचा मार्ग मूकनाट्यातून विद्यार्थ्यांनी सादर करीत उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवून घेतली़
मोबाईच्या अतिवारामुळे होणाºया दुष्परिणामाच्या नाट्यातून दिला सामाजिक संदेशही यावेळी मूकाभिनयातून देण्यात आला़ आजच्या फास्ट युगात मोबाइल जीवनावश्यक वस्तू झाली आहे. स्टे कनेक्ट म्हणत असतानाच हा मोबाइल अनेकदा जीवावर देखील उठतो. मोबाइलचे दुष्परिणाम अतिशय व्यंगात्मकरित्या विद्यार्थ्यांनी सादर केले़ सामाजिक विषयांवर भाष्य करणारे विद्यार्थी सकाळी ९ वाजेपासून आवारात तयारी करत होते़ गोमाई काठावरच्या मोकळ्या जागेत काही संघ तयारी करत होते़ बोचरी थंडी असूनही त्यांच्यातील उत्साह कायम होता़ स्पर्धा तब्बल अडीच तास उशिरा सुरु होणार असल्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेत तयारी सुरु ठेवली होती़ यात रंगीत तालीम करत एकमेकांना मूकनाट्यातील बारकावेही समजून सांगत होते़

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाºया हैदराबाद येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना मूकनाट्यातून पुन्हा जीवंत करण्यात आली़ अबला महिला डॉक्टरावर केला अत्याचार तिची निघृण हत्या आणि पोलिसांनी नरामधांचे केलेले एन्काउंटर हे संपूर्ण दृश्य अत्यंत ताकदीने विद्यार्थ्यांनी साकारले़ हा अनुभव घेताना उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी, शहादा शहरातील प्रेक्षक यांचे डोळे पाणावल्याचे यावेळी दिसून आले़ मूकनाट्यातून व्यसनमुक्तीचाही संदेश देण्यात आला़

हिंदी-मराठी आणि पाश्चिमात्य गीतांच्या सादरीकरणाला रसिकांची मनमुराद दाद

शहादा : युवारंगातील गायक सुधीर फडके रंगमंच क्रमांक दोनवर पाश्चिमात्य सुगमगायन आणि पाश्चिमात्य समुहगीत स्पर्धा झाली. मराठी व हिंदी गाण्यांइतकाच पाश्चिमात्य गाणीही स्पर्धक कलावंतांनी अत्यंत बहारदारपणे सादर केले़ क्वायर अर्थात कोरस या प्रकारातील सुरेल पाश्चिमात्य गीतांना उपस्थित प्रेक्षकांनीही उचलून धरले होते़
विद्यार्थ्यांनी इंग्रजी गाण्यांवर मिळवलेल्या हुकमतीबद्दल त्यांचे कौतूक देखील करण्यात आले़ दरम्यान याच मंचावर भारतीय समुहगीत स्पर्धा झाली. गोंधळ , देशभक्ती, लोकगीत, पाळणा, पारंपारिक गीत, लग्नगीत, युवक गीत, मल्हार गीत यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले़ त्या-त्या प्रांतातील लोकगीते सादर करताना अनेकांनी त्या प्रातांशी जोडली गेलेली वेषभूषा केल्याने स्पर्धेची रंगत वाढल्याचे दिसून आले़ लोकगीतांमधील सुरांसह त्यातील भावनिकता जपत स्पर्धक कलावंतांनी या गीतांचे सादरीकरण केले़ सर्वच गीतांच्या सादरीकरणावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता़
परीकथेतील राजकुमारा स्वप्नात येशील का़़़
गीतकार ग.दि.माडगुळकर रंगमंच क्रमांक चारवर सकाळी भारतीय सुगमगायन स्पर्धा झाली. यामध्ये हिंदी, मराठी, भावगीते, गझल सादर करण्यात आले. हम तेरे शहर मे आये, मुसाफिर की तरह या भावनरहित गीतांसह सुंदर ते ध्यान, कानडा राजा पंढरीचा, एकच टाळी झाली चंद्रभागेची वाळवंटी ही भक्तीगीते आणि परीकथेतील राजकुमारा स्वप्नामध्ये येशील का या प्रणयगीतांनी उपस्थित प्रेक्षकांचे मन मोहून टाकले होते़ याच मंचावर दुपारी शास्त्रीयगायन ही स्पर्धा झाली.
महोत्सवात आॅन द स्पॉट पेंटिंग या कलात्मक स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला़ महाविद्यालय परिसरातील १ किलोमीटरच्या अंतरातील स्थळांचे चित्र त्यांना रेखाटण्याचे सूचित करण्यात आले होते़ यासाठी त्यांना अडीच तासांचा अवधी देण्यात आला होता़ त्यासाठी अडीच तासांचा कालावधी देण्यात आला होता. आॅन द स्पॉट पेंटिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चित्रांमध्ये हिरवागार निसर्ग टिपण्याचा प्रयत्न केला.
परिसरातील गांधी कुटिया, कॉलेज गेट, हृदय कुंज, स्वर्गीय पीक़े़अण्णा पाटील यांचे स्मृतीस्थळ, दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या रस्त्याचे दृश्य साकारात विद्यार्थ्यांनी कलेचे दर्शन घडवले़ उत्तम रंगसंगतीचा वापर करत विद्यार्थी स्पर्धकांनी अत्यंत सुंदर निसर्गचित्रे रेखाटली़
विद्यार्थी स्पर्धकांना वेगळेपण टिपता यावे यासाठी आयोजक महाविद्यालयाने जागा तयार करुन त्या परिसरात इतरांना प्रवेश नाकारला होता़

राज्यात नुकतेच सत्ता स्थापनेसाठी रंगलेले राजकीय नाट्य आणि त्यानंतर वेगवान घडामोडी यावर कलाकारांनी प्रकाश टाकला़ हा विषय विनोदी पद्धतीने मांडताना कलावंत विद्यार्थ्यांनी साधलेले टायमिंग अफलातून होते़ सोबत देशात नागरिक कायद्याबाबत जागरुक नागरिक म्हणून आपली भूमिका काय, यावर विद्यार्थ्यांनी ऊहापोह केला़ तरूणांनी कायदा आधी समजून घेत निषेध किंवा पाठिंबा देण्याचा संदेश दिला़

मोठ-मोठी आश्वासन देवून राजकीय मंडळींकडून मतांचा जोगवा मागितला जातो़ भोळीभाबडी जनता या आश्वासनांना भुलून मतांचे दान देत नेत्याची निवड करतात़ परंतू कालांतराने आश्वासनांचा रतीब घालणाºया

Web Title: Read the questions thrown at 'art power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.