रावलापाणी विकासाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:52 IST2020-02-29T12:52:04+5:302020-02-29T12:52:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आदिवासींच्या स्वातंत्र्य लढ्याची ओळख असलेल्या रावलापाणीच्या पर्यटनस्थळाचे काम संबंधित यंत्रणेने हाती घेतले असले तरी ...

Rawalpindi development works slowly | रावलापाणी विकासाचे काम संथगतीने

रावलापाणी विकासाचे काम संथगतीने

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : आदिवासींच्या स्वातंत्र्य लढ्याची ओळख असलेल्या रावलापाणीच्या पर्यटनस्थळाचे काम संबंधित यंत्रणेने हाती घेतले असले तरी हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. आता वाढीव निधीदेखील उपलब्ध झाल्यामुळे या कामास गती देण्याची मागणी पर्यटनप्रेमींकडून होत आहे.
भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश साम्राज्या विरोधात २ मार्च १९४३ रोजी तळोद्यापासून नजीक असलेल्या रावलापाणी येथे आदिवासींनी तीव्र लढा दिला होता. त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. यात अनेक शहिदांना आपले हौतात्म्य पत्कारावे लागले होते. या घटनेमुळे साहजिकच रावलापाणीच्या आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामाची ओळख बनली होती. आदिवासी शहिदांचा हा इतिहास भावी पिढीस प्रेरणादायी व्हावा म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षापासून जिल्ह्यातील आदिवासी दरवर्षी २ मार्च रोजी शहिदांच्या स्मृतींना जागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावतात.
या सर्व पार्श्वभूमीवर तेथे पर्यटनस्थळ विकसीत व्हावे यासाठी डॉ.कांतीलाल टाटीया, पं.स.चे माजी सभापती जितेंद्र पाडवी, माजी सरपंच प्रवीण वळवी आदींनी शासनाकडे मागणी केली होती. त्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, खासदार डॉ.हीना गावीत यांनीही पाठपुरावा केला होता.
तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या विभागाकडून साधारण पावणे तीन कोटींचा निधीदेखील मंजूर केला होता. त्याचबरोबर वनविभागानेही आपल्या अखत्यारीतील दोन एकर जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केली होती. या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेने यंदा दिवाळीनंतर प्रत्यक्ष पर्यटनस्थळाचे काम हाती घेतले आहे. सुरूवातीला रावलापाणी गावापासून प्रत्यक्ष स्मारकापर्यंतच्या ४०० ते ५०० मीटर लांबीचा रस्ता करण्यात आला आहे. त्यानंतर तेथील हॉलचे काम हाती घेण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबविण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. असे असले तरी यात सर्वच तांत्रिक बाबी सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामालादेखील गती देण्याची मागणी इतिहास व पर्यटनप्रेमींकडून जोर धरू लागली आहे.

Web Title: Rawalpindi development works slowly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.