सारंगखेडा ग्रामपंचायतींवर रावल कुटुंबांचे वर्चस्व, नंदुरबारात जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या गटात कमळ फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:36+5:302021-01-19T04:33:36+5:30
दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील लक्षवेधी निवडणूक असलेल्या भालेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे सहा, तर शिवसेनेचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. माजी ...

सारंगखेडा ग्रामपंचायतींवर रावल कुटुंबांचे वर्चस्व, नंदुरबारात जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या गटात कमळ फुलले
दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील लक्षवेधी निवडणूक असलेल्या भालेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे सहा, तर शिवसेनेचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. माजी सरपंच भास्कर हिरामण पाटील यांच्या पॅनेलला बहुमत मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. या निवडणुकीत त्यांच्या स्नुषा कविता चंद्रशेखर पाटील व नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश पाटील यांच्या वैशाली पाटील यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत.
तालुक्यातील दुसरी लक्षवेधी निवडणूक असलेल्या कोपर्ली ग्रामपंचायतीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र व कोपर्ली गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनाही मोठा झटका बसला आहे. या ग्रामपंचायतीतील सर्व ११ जागांवर भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी कोपर्ली गावात केलेल्या प्रचारामुळे त्यांना हे यश प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे.
शहादा तालुक्यातील सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या मोहिदेतर्फे शहादा ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविण्यात भाजपला यश आले आहे. पारंपरिक विरोधी गटांमध्ये होणाऱ्या लढतींमुळे ही ग्रामपंचायत निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत होती. या निवडणुकीत विद्यमान सरपंच गिरधर पाटील यांच्या पॅनेलला भाजपचे भाऊभाई पाटील यांच्या पॅनेलने पराभूत केले आहे. त्यांच्या पॅनेलचे तब्बल १० उमेदवार निवडून आले आहेत. विद्यमान सरपंच गिरधर पाटील यांच्या पॅनेलचे केवळ पाच सदस्य निवडून आले आहेत.
शहादा तालुक्यातील भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत बामखेडातर्फे तऱ्हाडी येथे झाली. यात काँग्रेसचे सभापती अभिजित पाटील यांच्या गटाने भाजपच्या गटाला पराभूत केले. या ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते. यात ८३ टक्के मतदानानंतर काँग्रेसच्या गटाने आठ, तर भाजपच्या गटाने ३ जागांवर विजय प्राप्त केला.
तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व नेते असलेले मनोज चौधरी व विद्यमान सरपंच प्रा. लिना मनोज चौधरी हे पती-पत्नी या निवडणुकीत विजयी झाले. पॅनेलप्रमुख मनोज चाैधरी यांनी माजी सरपंच व २० वर्षांपासून एकाच प्रभागातून निवडून येणारे शिवदास चाैधरी यांचा पराभव केला. मनोज चाैधरी काँग्रेसचे सभापती अभिजित पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.