तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST2021-05-11T04:32:26+5:302021-05-11T04:32:26+5:30

नंदुरबार : वारंवारचे लॅाकडाऊन, संचारबंदी, कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे तरुणांचे नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण ...

The rate of mental stress increased in youth | तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण वाढले

तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण वाढले

नंदुरबार : वारंवारचे लॅाकडाऊन, संचारबंदी, कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे तरुणांचे नोकरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तरुणाईत मानसिक तणावाचे प्रमाण वाढू लागले आहे. यावर उपाय करण्यासाठी तरुणाईची मानसोपचारतज्ज्ञांकडे धाव वाढू लागली आहे.

गेल्या वर्षी कोरोना व लॅाकडाऊन यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. असे तरुण अद्यापही सावरलेले नाहीत. अजूनही त्यांना नोकरी मिळू शकली नाही. मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात कायम असून नवीन भरती होत नाही. परिणामी मोठ्या आशेने व अपेक्षेने मुंबई, पुणे, नाशिक सारख्या मोठ्या शहरात गेलेल्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. एवढे शिक्षण घेऊन, मोठ्या नोकरीचे स्वप्न पाहून हाती काहीच न आल्याने अशा तरुणांमध्ये मनातल्या मनात अपराधीपणा भासू लागला आहे. मानसोपचारतज्ज्ञांकडे गेल्या सहा महिन्यांपासून अशा रुग्ण असलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सकारात्मक विचार, कुटुंबाकडून सांभाळून घेणे या बाबी केल्या तर या प्रकाराला पायबंद घालता येऊ शकतो.

काय असतात तरुणांचे प्रश्न

तरुणांचा प्रश्न सहसा रोजगार व नोकरी हा असतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी आणि लग्नासाठी घरच्या लोकांकडून तगादा लावला जातो. त्यामुळे काहीतरी रोजगार मिळवून लग्न करण्यासाठी तरुणांची धडपड असते.

नोकरी मिळालीच तर ती जर कमी पगाराची आणि कमी दर्जाची राहिली तर त्याचाही परिणाम अशा तरुणांवर होतो. एवढे मोठे शिक्षण घेऊन काय उपयोग, म्हणून मनात न्यूनगंडाची भावना तयार होते. अशा वेळी कुटुंबाने त्यांना साथ देऊन समजून घेणे आवश्यक आहे.

नोकरी, रोजगारासह कुटुंबातील स्थिती, वैवाहिक स्थिती, प्रेमप्रकरण आदी प्रश्न व समस्यादेखील तरुणांच्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

पुरुष व्यक्त होत नाहीत

n मानसिक तणाव असो, दु:ख असो, सहसा पुरुष व्यक्त होत नाहीत असा अनुभव असतो. त्यामुळे मनातल्या मनात खचत जाऊन काही वेळा अप्रिय घटनेपर्यंत असे तरुण जाऊ शकतात.

n आपले दु:ख, समस्या, तणाव जर जवळच्या व्यक्तीजवळ सांगून मन मोकळे केले तर त्यातून उपाय निघू शकतो. त्यासाठी पुरुषांनी व्यक्त होणे आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

पर्यायी मार्गांचा विचार करावा...

n प्रत्येक समस्या, प्रश्न यांना पर्यायी मार्ग असतो. त्याचाही विचार करणे आवश्यक असते. नोकरी गेली म्हणून त्याच प्रकारची दुसरी नोकरी मिळावी यासाठी तरुणाईचा प्रयत्न असतो. त्याऐवजी रोजगार मिळवून देणारा दुसरा व्यवसाय, शेतीतील विविध प्रयोग केले तर त्यातूनही मोठे उत्पन्न मिळू शकते.

n यासाठी तरुणाईने व्यक्त होणे आवश्यक असते. त्यासाठी जवळच्या मित्राजवळ, पत्नी, आई, वडील किंवा कुटुंबाच्या इतर जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त व्हा, मन हलके करणे गरजेचे असते.

Web Title: The rate of mental stress increased in youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.