बलात्कार करुन दांडक्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:16 IST2019-05-21T12:16:18+5:302019-05-21T12:16:37+5:30
आरोपीला अटक : वसलाई येथील संतापजनक घटना

बलात्कार करुन दांडक्याने मारहाण
नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथे पीडितेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तालुक्यातील वसलाई येथील पीडितेवर शनिवार रोजी मध्यरात्री आरोपी उत्तम विक्रम वळवी रा़ वसलाई ता़ नंदुरबार याने घरात जाऊन अत्याचार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे़ तसेच घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवेठार मारण्याचीही धमकी पीडितेला देण्यात आली होती़ सुुरुवातीला घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेकडून कुणालाही सांगण्यात आले नाही़ परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने संबंधित आरोपीला याबाबतचा जाब विचारला असता आरोपी उत्तम विक्रम वळवी याने संबंधित पीडितेस लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली़ तसेच या मारहाणीत पीडितेच्या डाव्या पायाला व गुडघ्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे़
या मारहाणीत पायाचे हाडदेखील मोडले असल्याचे समोर आले आहे़ यानंतर पीडितेला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ यात, वैद्यकीय तपासणीदेखील करण्यात आली़ दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत एसडीपीओ रमेश पवार व पोलीस निरीक्षक भापकर यांनी अधिक माहिती घेण्यासाठी घटनास्थळी भेट दिली आहे़ दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवर सोमवारी नंदुराबर उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी उत्तम विक्रम वळवी याच्याविरुध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली असून पुढील तपास रुपाली महाजन करीत आहेत़